भारतीय रेल्वे (Indian Railway) काही खास लोकांसाठी ट्रेनमधून स्वस्तात प्रवास करण्यासाठी सवलती देते. या प्रकारात 13 प्रकारचे लोक येतात, ज्यामध्ये वृद्ध आणि अपंगांसह इतर काही आजारांनी ग्रासलेल्या लोकांचाही समावेश होतो. रुग्णांना त्यांच्या उपचारांसाठी होणारा प्रवासखर्च कमी करण्यासाठी रेल्वे त्यांना तिकिटांवर 75 टक्के पर्यंत सवलत देते. रुग्णांसोबतच त्यांच्यासोबत प्रवास करणाऱ्या एका मदतनीसासाठीही ही सवलत लागू होते. यासोबतच इतर अनेक गोष्टींसाठी रेल्वेच्या अनेक सवलती मिळतात. रेल्वे विभागने या नियमांचा प्रचार-प्रसार केलेला नाही. त्यामुळे याबद्दल खूप कमी जणांना माहिती असते.
- थॅलेसीमिया, हार्ट आणि किडनीसंबंधी आजार असणाऱ्या रुग्णांनासुद्धा रेल्वेने सवलत दिली आहे. थॅलेसीमिया पेशंट जर का चेकअपसाठी जात असतील तर ते या विशेष सवलतीचा फायदा घेऊ शकतात.
- हार्ट सर्जरी किंवा किडनी ट्रान्सप्लंट, डायलिसिससंबंधी आजार असणाऱ्या रुग्णांनाही रेल्वे सवलत देते. या रुग्णांना सेकंड क्लास, स्लीपर, फर्स्ट क्लास, थर्ड एसी, एसी चेअरमध्ये 75 % आणि फर्स्ट एसी व सेकंड एसीमध्ये 50 टक्के सूट मिळते. सोबत एका सहाय्यकदेखील या सवलतीच्या चौकटीत बसतो.
- टीबी, लुपस पेशंटना सेकंड क्लास, स्लीपर आणि फर्स्ट क्लास मध्ये 75 % पर्यंत सवलत मिळते. नॉन इन्फेक्शियस कुष्ट रुग्णांनाही ही सवलत लागू आहे.
- राष्ट्रीय स्तरावरील प्रवेश परीक्षेला जात असलेल्या शासकीय शाळेत शिकणाऱ्या मुलींना सेकंड क्लासमध्ये 75% सवलत मिळते.
- राष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होण्याकरिता जात असणाऱ्या खेळाडूला 75% डिस्काऊंट, तर स्टेट टुर्नामेंटमध्ये सहभागी होण्यासाठी जात असलेल्या खेळाडूला 50% डिस्काऊंट मिळतो.
- थिएटर, म्युझिक, डान्सिंग किंवा मॅजेशियन आर्टीस्ट लोकांना सेकंड अथवा स्लिपर क्लासमध्ये 75% सवलत. तसेच एसी चेअरकारमध्ये 50% डिस्काऊंट.
- प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक वर्गाच्या शिक्षकांना शैक्षणिक सहलीसाठी 25% सूट.
- शेतीसंबंधीत कार्यशाळा अथवा प्रदर्शनात सहभागी होण्यास जात असणाऱ्या शेतकऱ्याला 25% डिस्काऊंट मिळतो. दुग्धशाळेत/शेती संदर्भातील राष्ट्रीय पातळीवरील संस्थेला भेट देणाऱ्या शेतकरी व दुग्धजन्य उत्पादकांना 50 % सवलत. (हेही वाचा: खुशखबर! भारतीय रेल्वेत सुरु झाली नोकरभरती; जाणून घ्या पात्रता आणि अर्जाच्या अंतिम तारखा)
जर का तुम्ही अथवा तुमच्या ओळखीची कोणी व्यक्ती वरील आजारांनी त्रस्त असेल किंवा वरील यादीमध्ये बसत असेल, तर रेल्वे प्रवासादरम्यान तुम्ही या सवलतींचा लाभ घेऊ शकता. यासाठी तुम्हाला तिकीट बुक करताना तुम्ही कोणत्या प्रकारांमध्ये येता ते सांगणे गरजेचे आहे, तसेच गरज पडल्यास यासंबंधी कागदपत्रे दाखवणेही गरजेचे आहे.