Gautam Adani (Photo Credit - PTI)

Gautam Adani Become Asia's Richest Person: जगातील अव्वल अब्जाधीशांच्या यादीत शनिवारी मोठा फेरबदल झाला आहे. ब्लूमबर्ग बिलियनेअर्स इंडेक्सनुसार, अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी (Gautam Adani) यांनी रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांना नेट वर्थच्या बाबतीत मागे टाकले आहे. गेल्या काही दिवसांत शेअर बाजारात सूचिबद्ध झालेल्या अदानींच्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये झालेल्या प्रचंड वाढीमुळे त्यांच्या संपत्तीत मोठी वाढ झाली आहे. गौतम अदानी आता आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले आहेत.

गौतम अदानी बनले जगातील 11 व्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती -

अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी हे त्यांच्या संपत्तीत नुकत्याच झालेल्या वाढीमुळे जगातील 11 व्या सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले आहेत. त्यांची एकूण संपत्ती 111 अब्ज डॉलर्सवर पोहोचली आहे आणि एवढ्या संपत्तीने त्यांनी मुकेश अंबानींना मागे टाकले आहे. ब्लूमबर्गच्या मते, मुकेश अंबानी यांची संपत्ती 109 अब्ज डॉलर आहे. या आकडेवारीसह ते जगातील सर्वात श्रीमंतांच्या यादीत 12 व्या स्थानावर घसरले आहेत. (हेही वाचा -Adani Group To Enter UPI: अदानी समूह Paytm, PhonePe आणि Google Pay शी स्पर्धा करणार; कंपनी स्वत:ची UPI पेमेंट प्रणाली सुरू करण्याच्या तयारीत)

24 तासांत 45000 कोटी कमावले -

गेल्या 24 तासांत गौतम अदानी यांच्या संपत्तीत मोठी वाढ झाली आहे. त्यांची एकूण संपत्ती 5.45 अब्ज डॉलर्स किंवा सुमारे 45,000 कोटी रुपयांनी वाढली आहे. संपत्तीत अचानक झालेल्या या वाढीमुळे अदानी समूहाचे अध्यक्ष 12 व्या स्थानावरून एक पाऊल पुढे सरकले असून त्यांनी 11 वे स्थान पटकावले आहे. 2024 मध्ये सर्वाधिक कमाई करणाऱ्या अब्जाधीशांमध्ये गौतम अदानी यांचा समावेश आहे. 1 जानेवारी 2024 पासून आतापर्यंत त्यांनी 26.8 अब्ज डॉलर्सची कमाई केली आहे. मुकेश अंबानी यांच्या संपत्तीत यावर्षी 12.7 अब्ज डॉलरची वाढ झाली आहे. (वाचा -Mukesh Ambani : अंबानी की अदानी? कुणाची मुले आहेत जास्त श्रीमंत, फोर्ब्सची आकडेवारी काय सांगते?)

दरम्यान, 2023 हे वर्ष गौतम अदानी यांच्यासाठी खूप वाईट ठरले. 24 जानेवारी 2023 रोजी, जेव्हा अमेरिकन शॉर्ट सेलर फर्म हिंडेनबर्गने अदानी समूहावरील संशोधन अहवाल प्रकाशित केला, तेव्हा एका आठवड्याच्या आत, अदानीच्या शेअर्समध्ये आलेल्या सुनामीमुळे, ते टॉप-3 मधून घसरले आणि टॉप-10 अब्जाधीशांच्या यादीतून बाहेर पडले. आता तब्बल 16 महिन्यांनंतर तो पुन्हा आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले आहेत.