India's National Flag (Photo Credits: Pixabay)

जपान, रशिया आणि ऑस्ट्रेलियासारख्या देशांना मागे टाकून भारत आशियातील तिसरा सर्वात शक्तिशाली देश बनला आहे. अलीकडेच ऑस्ट्रेलियन थिंक टँक लोवी इन्स्टिट्यूटने 'एशिया पॉवर इंडेक्स रिपोर्ट 2024' (Asia Power Index Report 2024) प्रसिद्ध केला आहे. या आशिया पॉवर इंडेक्समध्ये एकूण 27 देशांचा समावेश आहे. संभाव्य बाह्य धोक्यांवर मात करण्यासाठी देशाची क्षमता किती आहे, या आधारावर हा अहवाल प्रसिद्ध करण्यात आला आहे. या यादीत युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका 81.7 गुणांसह पहिल्या स्थानावर आहे. चीन 72.7 गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे, तर भारताला 39.1 गुणांसह तिसरे स्थान मिळाले आहे. यावरून आशियातील भारताची ताकद झपाट्याने वाढत असल्याचे दिसून येते. गेल्या वर्षी या निर्देशांकात भारत चौथ्या स्थानावर होता. मात्र, महासत्ता होण्याच्या शर्यतीत भारत अजूनही खूप दूर आहे.

देशांची संसाधने आणि प्रभाव लक्षात घेऊन दरवर्षी ही यादी जाहीर केली जाते. या यादीत जपान आता चौथा सर्वात शक्तिशाली आणि प्रभावशाली आशियाई देश बनला आहे. या यादीत ऑस्ट्रेलियाला पाचवे तर युक्रेन युद्धात अडकलेल्या रशियाला सहावे स्थान मिळाले आहे. पाकिस्तानला केवळ 14.6 गुण मिळाले असून ते 16व्या स्थानावर आहे.

ही यदि बनवण्यासाठी देशांचा 6 वर्षांचा डेटा वापरण्यात आला आहे. आशियातील सत्तेच्या झपाट्याने बदलत असलेल्या वितरणाचे हे सर्वात व्यापक मूल्यांकन आहे. त्यात म्हटले आहे की, अमेरिका अजूनही आशियातील सर्वात प्रभावशाली शक्ती आहे परंतु आता त्याला चीनच्या वेगाने वाढणाऱ्या सैन्याच्या दबावाचा सामना करावा लागत आहे. या देशांचे मूल्यमापन त्यांच्या आर्थिक, संरक्षण, मुत्सद्देगिरी आणि इतर ताकदीच्या आधारावर केले गेले आहे. अहवालात म्हटले आहे की, चीनने लष्करी फायदा निश्चितच केला आहे पण त्याचा एकूण प्रभाव स्थिर आहे. चीनचे सामर्थ्य वाढत नाही आणि कमीही होत नसल्याचे आढळून आले आहे. (हेही वाचा: Gold Price Hike: सोने 75,000 रुपयांच्या पार; ऐन लग्नसराईत मोडले आतापर्यंतचे सर्व रेकॉर्ड)

त्याचवेळी अमेरिकेने आशियातील लष्करी ताकद वाढवली आहे. मात्र, अमेरिकेसाठी चिंतेची बाब म्हणजे एकूण लष्करी ताकदीच्या बाबतीत ते चीनच्या मागे आहे. या सर्वेक्षण अहवालात भारताचे कौतुक करण्यात आले आहे. अहवालानुसार, भारताची वाढ होत आहे पण ती थोडी मंद आहे. भारत आता जपानला मागे टाकून आशियातील तिसरा सर्वात शक्तिशाली देश बनला आहे, परंतु संसाधनांच्या तुलनेत त्याचा प्रभाव कमी आहे. आशिया खंडात भारताची ताकद वाढत असल्याचे अहवालात म्हटले आहे.