अक्षय कुमारच्या नागरिकत्त्वाच्या मुद्द्यावरून मागील काही दिवसांमध्ये सतत चर्चा सुरू होती. आज सामन्याच्या अग्रलेखात अक्षय कुमारकडे (Akshay Kumar) कॅनेडियन पासपोर्ट असणं ही केवळ तांत्रिक बाब असल्याचं म्हटलं आहे. यादरम्यान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी अक्षय कुमारला आयएनएस सुमित्राची (INS Sumitra) सफर घडवली. त्यावरूनही राजकीय वाद रंगायला सुरूवात झाली आहे.
शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामन्याच्या अग्रलेखामध्ये आज अक्षय कुमारला युद्धनौकेवर नेल्याचे प्रकरण काढणे हा पोरकटपणा असल्याचं म्हटलं आहे. राजीव गांधी यांनी ‘आयएनएस विराट’ या युद्धनौकेचे खासगी पर्यटन टॅक्सी सारखा वापर केल्याचा आरोप करणं आणि त्यावरून अक्षय कुमारला युद्धनौकेवर घेऊन गेल्याचं प्रकरण काढणं यामध्ये फरक असल्याचं म्हटलं आहे.
अक्षयकुमारने शहीद जवानांच्या कुटुंबीयांसाठी आपल्या कमाईतील मोठा वाटा दिला आहे. तसेच त्याने तरूणांमध्ये देशभक्ती जागृत ठेवण्यासाठी अनेक उपक्रम राबवले आहेत. असे म्हणत त्याचे समर्थन केले आहे.