Bigg Boss 13: मागच्या वर्षीच्या फ्लॉप सीझनमुळे बिग बॉस 13 मध्ये केला मोठा बदल; 'या' लोकांना मिळणार नाही प्रवेश
सलमान खान (Photo Credits: File Photo)

बिग बॉस 12 (Bigg Boss 12) ने टीआरपीच्या बाबतीत बऱ्यापैकी निर्मात्यांचा अपेक्षाभंग केला होता. सेलिब्रिटी (Celebrities) आणि कॉमनर्स (Commoners) यांच्या थीमवर आधारित हा लोकप्रिय शो  मागच्या वर्षी दर्शकांचे मनोरंजन करू शकला नाही. मागच्या वर्षी झालेल्या चुका लक्षात घेऊन यावर्षी येणाऱ्या बिग बॉस 13 (Bigg Boss 13) मध्ये निर्मात्यांनी एक मोठा बदल केला आहे. यावर्षी या शोमध्ये कॉमनर्सना म्हणजे सामान्य नागरिकांना प्रवेश दिला जाणार नाही. त्यामुळे यावर्षी बिग बॉस 13 मध्ये फक्त सेलिब्रिटी लोक पाहायला मिळणार आहेत.

बॉलिवूड लाईफने दिलेल्या वृत्तानुसार, बिग बॉस 12 फ्लॉप झाल्यानंतर 13 व्या पर्वासाठी हा मोठा बदल करण्यात आला आहे. 2016 मध्ये, बिग बॉस 10 मध्ये  पहिल्यांना कॉमनर्सना प्रवेश दिला होता. त्याआधी 1, 2 आणि 6 व्या पर्वातही सामान्य नागरिक या शोमध्ये  सामील झाले होते.  मनु पंजाबी आणि मनवीर गुर्जर या दोन सामान्य नागरिकांनी 10 व्या पर्वाला बरीच लोकप्रियता मिळवून दिली होती. मनवीर गुर्जर हा त्या पर्वाचा विजेता ठरला होता. नंतर 11 व्या पर्वात पुनिश आणि बंदगी यांच्या जोडीला लोकांनी पसंत केले. मात्र 12 वे पर्व ती जादू दाखवू शकला नाही. शेवटी निर्मात्यांनी ही कॉमनर्सची संकल्पनाच काढून टाकली. (हेही वाचा: बिग बॉसच्या घरातील कोणालाही माहित नसणारे 10 मोठे खुलासे)

दरम्यान सलमान खान या या पर्वाचे सूत्रसंचालन करणार नाही अशा वावड्या उठल्या होत्या, मात्र आता तोच सूत्रसंचालन करणार असल्याच्या बातमीवर शिक्कामोर्तब झाले आहे. बिग बॉसच्या सेट हा नेहमी लोणावळ्यात उभारला जातो, मात्र यावर्षी पहिल्यांदा हा सेट गोरेगाव इथे उभारला जाणार आहे. बिग बॉस मराठीच्या दुसऱ्या पर्वाचा सेटही गोरेगाव इथेच उभा केला आहे. बिग बॉस मराठीचे 2 रे पर्व 26 मे पासून सुरु होत आहे, तर हिंदी बिग बॉस 13 ची तारीख लवकरच जाहीर होणार आहे.