Fake Currency Notes (Photo Credits-ANI)

Dearness Allowance of Central Government Employees: केंद्र सरकारी सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. केंद्रसेवेतील पात्र कर्मचाऱ्यांचा जुलै महिन्याचा वाढीव महागाई भत्ता लवकरच वाढण्याची शक्यता आहे. प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार सप्टेंबर 2023 मध्ये त्यांना ही वाढ मिळण्याची शक्यता आहे. अर्थात ही वाढ नेमकी कधी मिळणार याबाबत निश्चित तारीख अद्यापही पुढे आली नाही. परंतू, सरकार लवकरच याबाबत घोषणा करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. देशातील किरकोळ चलनवाढीचा दर जुलैमध्ये 15 महिन्यांच्या उच्चांकावर पोहोचला आहे. त्यामुळे या अहवालानुसार, सरकारने महागाई भत्ता (DA) 3% पॉइंटने वाढवून 45% करणे अपेक्षित आहे. असे घडले तर 1 जुलै 2023 पासून महागाई भत्त्याची वाढ लागू होऊ शकते.

केंद्रीय सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी महागाई भत्ता गणना कामगार ब्युरोने दरमहा काढलेल्या औद्योगिक कामगारांसाठी (CPI-IW) नवीनतम ग्राहक किंमत निर्देशांकाच्या आधारे केली जातो. ऑल इंडिया रेल्वेमेन फेडरेशनचे सरचिटणीस शिव गोपाल मिश्रा यांच्या हवाल्याने पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार, जून 2023 साठी CPI-IW 31 जुलै 2023 रोजी प्रसिद्ध करण्यात आला. आम्ही महागाई भत्त्यात चार टक्के वाढ करण्याची मागणी करत आहोत. परंतु महागाई भत्त्याची वाढ ही तीन टक्क्यांपेक्षा थोडी जास्त आहे. त्यामुळे डीए तीन टक्क्यांनी वाढून ४५ टक्क्यांपर्यंत जाण्याची शक्यता आहे. मिश्रा यांनी पुढे म्हटले की, अर्थ मंत्रालयाचा खर्च विभाग त्याच्या महसुलाच्या परिणामासह डीए वाढवण्याचा प्रस्ताव तयार करेल आणि तो प्रस्ताव केंद्रीय मंत्रिमंडळासमोर मंजुरीसाठी ठेवेल आणि त्यानंतर डीए वाढीची घोषणा केली जाईल.

प्राप्त माहितीनुसार, सध्यास्थितीत जवळपास एक कोटींहून अधिक केंद्र सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांना 42% महागाई भत्ता मिळत आहे. केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना डीए मिळतो, तर पेन्शनधारकांना डी.आर. DA आणि DR वर्षातून दोनदा वाढवला जातो. पाठिमागच्या वेळी, मार्च 2023 मध्ये महागाई भत्ता वाढवण्यात आला होता आणि तो 4% ने वाढवून 42% करण्यात आला होता. सध्याचा महागाईचा दर पाहता, विविध अहवालांनुसार पुढील DA वाढ 3% अपेक्षित आहे.