7th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांना उद्या मिळू शकते खुशखबर; महागाई भत्ता संदर्भात महत्त्वपूर्ण बैठक
प्रतिकात्मक फोटो (Photo Credits-Twitter)

7 व्या वेतन आयोगानुसार (7th Pay Commission) पगार आणि भत्ता मिळणाऱ्या केंद्रीय कर्मचाऱ्यांना 1 जुलैपासून महागाई भत्त्याचा संपूर्ण लाभ घेता येणार आहे. यासोबतच थकलेला महागाई भत्ता सुद्धा त्यांना मिळू शकतो. यासंदर्भात उद्या एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडणार आहे. या बैठकीचे प्रमुख कॅबिनेट सेक्रेटरी राजीव गौबा (Rajiv Gauba) असतील. यासोबतच या बैठकीमध्ये केंद्रीय कर्मचाऱ्यांचे प्रतिनिधित्व करणारे अधिकारी उपस्थित असतील. तसंच अर्थ मंत्रालयातील अधिकारी आणि कर्मचारी व प्रशिक्षण विभागाचे अधिकारी देखील या बैठकीला हजेरी लावतील. महागाई भत्ता आणि त्याची थकबाकी हा या बैठकीचा मुख्य उद्देश असेल, अशी माहिती शिवगोपाल मिश्रा यांनी दिली. 7 व्या वेतन आयोगाबद्दल कर्मचाऱ्यांच्या वतीने गोपाल मिश्रा यांनी प्रतिनिधित्व केले होते.

1 जानेवारी 2020, 1 जुलै 2020 आणि 1 जानेवारी 2021 पासून थकीत असलेला महागाई भत्ता आणि 1 जुलै पासून सुरु होणारा महागाई भत्ता यासंबंधी या बैठकीत चर्चा केली जाईल, अशी माहिती मिश्रा यांनी द मिंट शी बोलताना या महिन्याच्या सुरुवातीला दिली होती. मागील वर्षी सुरु झालेल्या कोविड-19 च्या संकटकाळात जानेवारी 2020, जुलै 2020 आणि जानेवारी 2021 असे महागाई भत्त्याचे तीन हप्ते केंद्र सरकारकडून थांबवण्यात आले होते. (7th Pay Commission: पेन्शनधारकांसाठी दिलासादायक बातमी! गैरसोय टाळण्यासाठी केंद्र सरकारने जारी केले नवे निर्देश)

केंद्र सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारक यांना 1 जुलै पासून महागाई भत्त्याचा संपूर्ण लाभ घेता येईल, अशी घोषणा यापूर्वीच झाली आहे. यासोबतच थकीत असलेल्या महागाई भत्ता देखील कर्मचाऱ्यांना मिळेल. थकीत असलेला महागाई भत्ता एक रक्कमी देणे सरकारला शक्य नसेल तर हप्त्यांच्या स्वरुपात कर्मचाऱ्यांना देण्यात यावा, असा प्रस्ताव जेसीएमने केंद्र सरकारसमोर मांडल्याचे मिश्रा यांनी सांगितले. दरम्यान, उद्याच्या बैठकीनंतर केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर येण्याची आशा आहे.