देशभरात २०१८या वर्षात सिलिंडरच्या किमती भरमसाठ वाढताना दिसत आहेत. एप्रिल महिन्यात जे सिलिंडर ६४९ रुपयांना मिळत होते तेच सिलिंडर ऑक्टोबर महिन्यात तब्बल ८७५ रुपयांना मिळू लागले आहे. दरम्यान, सिलिंडरवर मिळणाऱ्या सबसीडीत वाढ तर झाली आहे. मात्र, ऑटोमॅटीक सिस्टमच्या भानगडीत ही रक्कम ग्राहकाच्या खात्यात कधी पोहोचते आहे तर, कधी नाही.
दरम्यान, एका बाजूला गॅस सिलिंडरच्या किमतीमध्ये होणारी भरमसाठ वाढ. तर, दुसऱ्या बाजूला ग्राहकांना मिळणाऱ्या सबसीडीत असणारी अनियमितता. याचा ग्राहकांना चांगलाच फटका बसत आहे. एका दैनिकाने दावा केला आहे की, काही गॅस ग्राहकांचे सबसीडी अकाऊंट अचानक अकार्यरत (अनअॅक्टीव्ह) होते. ग्राहकाला याची माहिती मिळते. तेव्हा ते संबंधीत बँकेशी संपर्क करतात. या ग्राहकांना बँक आपल्या खात्यात काहीच समस्या नसून ते सुरु असल्याची माहिती देते. दुसऱ्या बाजूला गॅस एजन्सीकडून सांगण्यात येते की, ग्राहकांनी बँकांकडे जाण्याआधी आमच्याकडे यावे. आम्ही त्यांच्या शंकांचे निरसन करु.
एप्रिल महिन्यात एलपीजी गॅस सिलिंडरचे दर ६४९ रुपये होते. तर, त्यावर मिळणारी सबसीडी १६१ रुपये होती. मे महिन्यात सिलिंडरची किंमत होती ६४६ रुपये तर, सबसीडी होती १५९ रुपये. जून महिन्यात सिलिंडरची किंमत होती ६९४ रुपये तर सबसीडी होती २०४ रुपये. जुलैमध्ये सिलिंडर होते ७५२ रुपये तर, सबसीडी होती २५९रुपये. ऑगस्ट महिन्यात सिलिंडरच्या किमती होत्या ७८७रुपये तर, सबसीडी होती २९३ रुपये. सप्टेंबर महिन्या सिलिंडरच्या किमती होत्या ८१८ रुपये सबसीडी होती ३२२ रुपये आणि ऑक्टोबर महिन्यात सिलिंडरच्या किमती होत्या ८७५ रुपये तर सबसीडी होती ३७९.
दरम्यान, या वाढत्या किमती आणि अधून मधून सबसीडीचे पैसे जमा होताना होणारी अनियमितता यामुळे ग्राहक वैतागले आहेत.