
विपुल आणि बजेटमध्ये बसणाऱ्या वाहतुकीच्या साधनांच्या उपलब्धतेमुळे सध्या प्रवास करण्याचे प्रमाण फार वाढले आहे, अशातच विमानसेवा देणाऱ्या कंपन्याही जनतेच्या दिमतीला उभ्या आहेत. विमान प्रवासाच्या घटलेल्या किंमतीमुळे लोक विमानप्रवासाला प्राधान्य देताना दिसून येत आहेत. म्हणूनच नुकतेच इंडिगो (IndiGo) या विमानसेवा देणाऱ्या कंपनीने नवीन विमाने खरेदी केली, या कंपनीकडे असलेल्या विमानांची संख्या आता 200 झाली आहे. यामुळेच इंडिगो ही भारतातील सर्वात जास्त विमाने असणारी कंपनी ठरली आहे. त्यात इंडिगोने प्रभावी अशी इयरएंड ऑफर आणून ग्राहकांना चांगलेच आकर्षित केले आहे.
‘फॉरेन स्काईज, लोकल फेअर्स’ असे या इंडिगोच्या ऑफरचे नाव असून, या ऑफर अंतर्गत आंतरराष्ट्रीय विमान प्रवासाचे तिकीट हे फक्त 3,299 रुपयांपासून सुरु होणार आहे. यासाठी तुम्हाला 12 ते 16 डिसेंबर दरम्यान तुमच्या प्रवासाचे तिकीट बुक करावे लागेल. 2018 मधील इंडिगोची ही सर्वात उत्कृष्ट ऑफर असल्याचे सांगितले जात आहे. या कालावधीमध्ये बुक केलेल्या तिकिटांवर तुम्ही 27 डिसेंबर 2018 ते 15 एप्रिल 2019 पर्यंत प्रवास करू शकाल. (हेही वाचा : आता बँकॉक फक्त साडेतीन हजारात, तर दुबई पाच हजारात)
मात्र अपघात आणि प्रवास यांचे नाते पाचवीलाच पूजले आहे. इंडिगोही त्याला अपवाद नाही. नुकतेच जयपूरवरून कलकत्त्याला जाण्यासाठी उड्डाण घेतलेल्या इंडिगोच्या विमानातून अचानक धूर निघू लागला. हे विमान कलकत्त्यापासून सुमारे 45 किमी दूर असताना त्याच्या कॉकपिट आणि केबिनमधून धूर निघू लागला. विमानातील प्रवाशांच्या जिवाला असलेला धोका पाहून वैमानिकाने 'मे डे' कॉल करून इमर्जन्सी लॅंडिंगची परवानगी मागितली. त्यावेळी विमानात 136 प्रवासी होते. याबाबतीत एयरक्राफ्ट ऍक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन बोर्डाला सदर घटनेची चौकशी करण्याचे आदेश नागरी विमानचालन मंत्रालयाने दिले आहेत.
आज सकाळीही अशीच एक गोंधळ उडणारी घटना इंडिगोच्या बाबतीत घडली. मुंबईवरून दिल्लीमार्गे लखनऊला जात असलेल्या इंडिगो कंपनीच्या विमानामध्ये चक्क बॉम्ब असल्याची माहिती मिळाली. एका महिलेने इंडिगोच्या विमानामध्ये बाँम्ब असल्याची माहिती इंडिगो चेक-इन काऊंटरवर दिली. त्यावेळी तिने तिच्याकडे असणारी काही छायाचित्रेसुद्धा दाखवली आणि हे लोक देशासाठी धोकादायक असल्याचा दावा केला. यानंतर विमानाची कसून तपासणी करण्यात आली, परंतु तपासात काहीच आढळून आले नाही. सध्या पोलीस त्या महिलेची कसून चौकशी करत आहेत.