1 जून पासून दररोज 200 नॉन एसी रेल्वे गाड्या (Non AC Trains) धावणार असल्याची घोषणा केंद्रीय रेल्वे मंत्री पियूष गोयल (Railways Minister Piyush Goyal) यांनी केली आहे. देशभरात अडकून पडलेल्या स्थलांतरित मजुरांसाठी 'श्रमिक स्पेशल' (Shramik Special) तसेच 'राजधानी स्पेशल' (Rajdhani Special) रेल्वे गाड्या सुरु करण्यात आल्या होत्या. त्यानंतर आता 1 जूनपासून देशभरात मेल एक्स्प्रेस रेल्वे गाड्या सुरू करण्यात येणार आहेत. या गाड्या वेळापत्रकानुसार सोडल्या जाणार आहेत, असंही पियूष गोयल यांनी ट्विट करून स्पष्ट केलं आहे.
विशेष म्हणजे या रेल्वे गाड्यांचे ऑनलाइन बुकिंग लवकरच सुरु होईल, असंही गोयल यांनी सांगितलं आहे. कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर देशात 31 मे पर्यंत लॉकडाऊन घोषीत करण्यात आले आहे. लॉकडाऊनमुळे देशातील विविध राज्यात मजूर अडकून पडले आहेत. यातील काही मजूरांनी पायी चालत गावाकडचा रस्ता धरला आहे. तर काहींनी श्रमिक रेल्वेचा लाभ घेत आपले गावं गाठला आहे. (हेही वाचा - आता देशातील प्रत्येक जिल्हातून धावणार 'Shramik Special' ट्रेन; जिल्हाधिकारी तयार करणार अडकलेल्या कामगारांची यादी- रेल्वेमंत्री पियुष गोयल)
Indian Railways to run 200 non-AC trains from 1st June everyday as per the time table; online booking for these to begin soon: Railways Minister Piyush Goyal pic.twitter.com/FyuDQYCfq8
— ANI (@ANI) May 19, 2020
दरम्यान, आता 1 जून पासून रोज 200 रेल्वे गाड्या धावणार आहेत. त्यामुळे या रेल्वेच्या माध्यमातून लॉकडाऊनमध्ये अडकलेल्यांना गावी जाता येणं शक्य होणार आहे. यासाठी ऑनलाईन तिकीट बुकिंगची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. राज्य सरकारने स्थलांतरित मजुरांना सहकार्य करावं, असं आवाहनही पियूष गोयल यांनी केलं आहे.
देशभरात लॉकडाऊनमुळे विविध भागांमध्ये अडकलेल्या मजुरांना ‘श्रमिक स्पेशल ट्रेन’ चा मोठा दिलासा मिळाला आहे. भारतीय रेल्वे कोणत्याही जिल्ह्यातून 'श्रमिक स्पेशल' ट्रेन चालविण्यासाठी सज्ज असल्याचंही पियूष गोयल यांनी यापूर्वी म्हटलं होतं. प्रवासी कामगारांना मोठा दिलासा मिळावा या उद्देशाने भारतीय रेल्वे देशातील कोणत्याही जिल्ह्यातून ‘श्रमिक स्पेशल ट्रेन’ चालवण्यास तयार आहे. यासाठी जिल्हाधिका्यांना अडकलेल्या कामगारांची यादी व त्यांचे गंतव्य स्थानक तयार करून राज्य नोडल अधिकाऱ्यांमार्फत रेल्वेला अर्ज करावा लागणार आहे, असं पियुष गोयल यांनी स्पष्ट केलं होतं.