देशभरात लॉक डाऊन (Lockdown) मुळे विविध भागांमध्ये अडकलेल्या मजुरां (Stranded Workers) साठी रेल्वेने ‘श्रमिक स्पेशल ट्रेन’ (Shramik Special Train) सुरु करून मोठा दिलासा दिला. याद्वारे देशातील विविध महत्वाच्या शहरांमधून अनेक कामगार आपल्या घरी पोहोचले. आता रेल्वेमंत्री पीयूष गोयल (Railway Minister Piyush Goyal) यांनी शनिवारी एका निवेदनात म्हटले आहे की, भारतीय रेल्वे कोणत्याही जिल्ह्यातून 'श्रमिक स्पेशल' ट्रेन चालविण्यासाठी सज्ज आहे. ते पुढे म्हणाले की, यासाठी जिल्हाधिकारी त्यांच्या जिल्ह्यात अडकलेल्या कामगारांची यादी तयार करतील. जिल्हाधिकाऱ्यांना राज्य नोडल अधिकाऱ्यांसोबतच रेल्वेने नामित केलेल्या नोडल अधिकाऱ्यांसोबत चर्चा करावी लागेल.
याबाबत पीयूष गोयल यांनी ट्वीट केले आहे की, 'प्रवासी कामगारांना मोठा दिलासा मिळावा या उद्देशाने भारतीय रेल्वे देशातील कोणत्याही जिल्ह्यातून ‘श्रमिक स्पेशल ट्रेन’ चालवण्यास तयार आहे. यासाठी जिल्हाधिका्यांना अडकलेल्या कामगारांची यादी व त्यांचे गंतव्य स्थानक तयार करून राज्य नोडल अधिकाऱ्यांमार्फत रेल्वेला अर्ज करावा लागणार आहे.’
पियुष गोयल ट्वीट -
To provide relief to migrant labour, Indian Railways is ready to run "Shramik Special" trains from any District in the Country. District Collectors should prepare lists of stranded labour & destination and apply to Railways through the State nodal officer.
— Piyush Goyal (@PiyushGoyal) May 16, 2020
रेल्वेच्या म्हणण्यानुसार सध्या त्यांच्याकडे दररोज 300 ‘श्रमिक स्पेशल ट्रेन’ चालवण्याची क्षमता आहे. परंतु सध्या रेल्वेगाड्या केवळ निम्म्या संख्येने धावत आहेत. रेल्वेच्या पूर्ण क्षमतेचा उपयोग केल्यास ज्या कामगारांना आपापल्या घरी जायचे आहे त्यांना मोठा दिलासा मिळेल. निवेदनात म्हटले आहे की, रेल्वेने शनिवारपर्यंत 15 लाख स्थलांतरित कामगारांना त्यांच्या गंतव्य स्थानापर्यंत पोहचवले असून, यासाठी 1150 मजुरांसाठी विशेष गाड्या वापरण्यात आल्या. (हेही वाचा: वाहनांवर Fastag असूनही जर त्यामध्ये आढळल्या 'या' त्रुटी तर भरावा लागणार दुप्पट दंड)
आतापर्यंत या अभियानांतर्गत गाड्यांमधून बहुतेक कामगार उत्तर प्रदेशात पोहोचले आहेत, त्यानंतर बिहारचा क्रमांक लागतो. रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी स्थलांतरितांच्या वाहतुकीसाठी रेल्वेगाड्यांमध्ये उत्तर प्रदेश आणि बिहारच्या सक्रिय सहभागाचे कौतुक केले आणि ते म्हणाले की 80 टक्के कामगार गाड्या या दोन राज्यात गेल्या आहेत.