नौदलाकडून नौदल तळ आणि युद्धनौकांवर स्मार्ट फोनसह सोशल मीडियावर बंदी
Indian Navy bans social media and smartphones (PC - Twitter)

नौदलाने (Indian Navy) भारताच्या सुरक्षिततेसाठी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. आता नौदलाचे तळ तसेच युद्धनौका यांच्यावर फेसबुक, इन्स्टाग्राम, व्हॉट्‌सॲप आदी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मस आणि स्मार्टफोनच्या वापरावर बंदी घालण्यात (Indian Navy Bans Smartphones) आली आहे, अशी माहिती भारतीय नौदलाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली आहे.

काही दिवसांपूर्वी नौदलाच्या 7 कर्मचाऱ्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून संवेदनशील माहिती शत्रूच्या गुप्तचर संस्थांना पुरवली होती. या 7 नौदल कर्मचाऱ्यांविरोधात या प्रकरणी कारवाई करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर नौदलाने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. सोशल मीडिया आणि स्मार्टफोन वापरासंदर्भात अधिक कडक नियम करण्यात आल्याचेही नौदलाच्या अधिकाऱ्याने सांगितले आहे. (हेही वाचा - अभिमानस्पद! महाराष्ट्राचे सुपुत्र मनोज मुकुंद नरवणे आज लष्करप्रमुख पदी स्वीकरणार कार्यभार)

नौदलानेकडून फेसबुक तसेच इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून अतिशय संवेदनशील माहिती शत्रूंना पुरवणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आला होता. शत्रूंना माहिती पुरवणाऱ्या नौदलाच्या 7 कर्मचाऱ्यांना केंद्रीय गुप्तचर संस्थेच्या साह्याने आंध्र प्रदेश पोलिसांनी अटक केली आहे. हे कर्मचारी नौदलाची अतिशय संवेदनशील माहिती पाकिस्तानला पुरवत होते, असंही नौदल अधिकाऱ्याने सांगितलं आहे. नौदलाच्या या नव्या नियमांमुळे भारतीय नौदलातील पाणबुड्या आणि युद्धनौकाविषयी संवेदनशील माहीती लिक न होण्यास मदत होणार आहे.