Flight | Representational Image (Photo Credits: Pixabay)

ब्रिटनमध्ये सापडलेल्या कोरोना विषाणूच्या नव्या प्रकारामुळे जगभरात दहशत पसरली आहे. दरम्यान, कोरोनाचे नवे संकट भारतात येऊ नये म्हणून केंद्र सरकारने ब्रिटनला जाणारी आणि येणारी विमाने (India-UK Flights) काही दिवसांपुरती रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, भारत आणि ब्रिटनमधील विमानांच्या उड्डाणांची तात्पुरती स्थगिती उठवण्यात आली आहे. विमान वाहतूक मंत्री हरदीप सिंग पुरी (Hardeep Singh Puri) यांनी ट्विटरच्या माध्यमातून यासंदर्भात माहिती दिली आहे. तसेच येत्या 8 जानेवारीपासून भारत आणि ब्रिटेन दरम्यानच्या विमान उड्डाणांना संमती देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले आहे.

चीनमध्ये जन्मलेल्या कोरोनाने संपूर्ण जगभरात हाहाकार माजवला आहे. दरम्यान, संपूर्ण जग कोरोनाविरोधात लढा देत असताना ब्रिटेनमध्ये कोरोनाच्या नव्या स्ट्रेनचे रुग्ण आढळून येऊ लागले आहेत. यामुळे सर्वत्र भितीजनक वातावरण निर्माण झाले आहे. याचपार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून भारत सरकारने गेल्या 23 डिसेंबरपासून ब्रिटन आणि भारत यांच्यातील विमानसेवा तात्पुरती स्थगित करण्याचा निर्णय घेतला होता. आधी ही मुदत 31 डिसेंबरपर्यंत होती. मात्र, त्यानंतर ती वाढवून 7 जानेवारीपर्यंत करण्यात आली आहे. आता 8 जानेवारीपासून भारत-ब्रिटनमधील विमान सेवा पुन्हा सुरु होणार आहे. महत्वाचे म्हणजे, येत्या 23 जानेवारीपर्यंत एका आठवड्यात 15 उड्डाणांना परवानगी देण्यात आली आहे. दिल्ली, मुंबई, बंगळुरू आणि हैदराबादवरून यूकेला जाणारी फक्त 15 विमाने दर आठवड्याला उडू शकतील, अशी माहिती हरदीप सिंग पुरी यांनी दिली आहे. हे देखील वाचा- New Strain of Coronavirus in India: भारतामध्ये ब्रिटन मधीन नवीन कोरोना वायरसची लागण असलेल्या रूग्णांची संख्या 29 वर

ट्विट-

भारतात कोरोनाचा आलेख खालावत असल्याचे दिसत आहे. देशात गेल्या काही दिवसांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या 20 हजारांच्या आसपास राहिली आहे. तसेच देशात गेल्या 24 तासांमध्ये 20 हजार 35 कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर, 23 हजार 181 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. मागील 35 दिवसांमध्ये कोरोनामुक्तांची संख्या नवी रुग्णांच्या तुलनेत अधिक आहे. यामुळे सक्रिय रुग्णसंख्येत घट दिसून येते आहे.