PM Modi On 26/11 Mumbai Attack: पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी रविवारी 'मन की बात' (Mann ki Baat) च्या 107 व्या आवृत्तीत मुंबईतील 26/11 च्या दहशतवादी हल्ल्यातील (Terrorist Attack) शहीदांचे स्मरण केले. या घटनेचा उल्लेख मोदींनी सर्वात नृशंस दहशतवादी हल्ला असा केला. आम्ही 26 नोव्हेंबर हा दिवस कधीही विसरू शकत नाही. याच दिवशी देशावर सर्वात भयंकर दहशतवादी हल्ला झाला होता. आज संपूर्ण देश शहीद झालेल्या आपल्या शूरवीरांना स्मरण करत आहे, अशा शब्दांत पंतप्रधानांनी या हल्ल्यात प्राण गमावलेल्या सर्व व्यक्तींना श्रद्धांजली वाहिली.
दहशतवादी हल्ल्यांमुळे (26/11) मुंबई तसेच संपूर्ण देश हादरला होता. मात्र, भारताने या घटनेतून सावरण्यासाठी आपली क्षमता वापरली आणि आता तेच धैर्य दहशतवादाला चिरडण्यासाठी वापरत आहे, असे पंतप्रधान मोदी म्हणाले. परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी देखील सोशल मीडिया अताऊंटवरून या घटनेचे स्मरण करत शहीदांना श्रद्धांजली वाहिली. 26/11 च्या मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याला आज 15 वर्षे पूर्ण झाली आहेत. या भीषण कृत्यांचे नियोजन आणि अंमलबजावणी करणाऱ्यांना न्याय मिळवून देण्याचा आमचा प्रयत्न सुरूच आहे, असं जयशंकर यांनी म्हटलं आहे. (हेही वाचा - 26/11 Mumbai Terror Attack: शहिदांना मुंबई पोलीस आयुक्त कार्यालयाच्या आवारात राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून श्रद्धांजली अर्पण)
मुंबईतील 26/11 चा दहशतवादी हल्ला भारताच्या आर्थिक राजधानीतील विविध लोकप्रिय ठिकाणी 10 दहशतवाद्यांच्या गटाने केला होता. हे दहशतवादी लष्कर-ए-तैयबा (एलईटी) या दहशतवादी गटाचे होते. त्यांनी 26 नोव्हेंबर 2008 च्या रात्री त्यांनी शहरात प्रवेश केला होता. चार दिवसांच्या कालावधीत त्यांनी तब्बल 166 लोकांना ठार केले आणि 300 जण जखमी केले.
छत्रपती शिवाजी टर्मिनस रेल्वे स्थानकावरील हल्ल्यातून जिवंत राहिलेला एकमेव पाकिस्तानी दहशतवादी मोहम्मद अजमल अमीर कसाब याला अटक करण्यात आली होती. तर एलईटीचे नऊ दहशतवादी ठार झाले होते. मे 2010 मध्ये, कसाबला फाशीची शिक्षा देण्यात आली. दरम्यान, आज महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 26/11 च्या दहशतवाद्यांशी लढताना शहीद झालेल्या जवानांना पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली.