Sadhus Beaten Up In West Bengal (PC - X/ @amitmalviya)

Sadhus Beaten Up In West Bengal: पश्चिम बंगालमधील (West Bengal) गंगासागर मेळ्याला जाणाऱ्या उत्तर प्रदेशातील तीन साधूंना (Sadhus) गुरुवारी संध्याकाळी जमावाने मारहाण केली. याप्रकरणी 12 जणांना अटक करण्यात आली आहे. आरोपींना पुरुलिया जिल्ह्यातील न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. पश्चिम बंगालमध्ये साधूंना जमावाने केलेल्या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर भाजपकडून राज्यातील तृणमूल काँग्रेस सरकारवर सातत्याने हल्लाबोल करण्यात येत आहे. मात्र, याप्रकरणी टीएमसीकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर एक व्हिडिओ पोस्ट करत भाजपचे आयटी सेल प्रमुख अमित मालवीय यांनी म्हटलं आहे की, 'ममता बॅनर्जींना त्यांच्या मौनाची लाज वाटली पाहिजे. तुमच्यासाठी या संतांचे काही महत्त्व नाही का? या अत्याचाराची उत्तरे हवी आहेत.' (हेही वाचा - Sadhus Beaten Up in Sangli: साधूंना बेदम मारहाण ...

दरम्यान, 30 सेकंदांच्या व्हिडिओमध्ये साधूंच्या एका गटाला जमावाकडून विवस्त्र करून मारहाण करताना दिसत आहे. अमित मालवीय यांनी या घटनेची 2020 मध्ये पालघरमध्ये घडलेल्या घटनेशी तुलना केली. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, 'पश्चिम बंगालमधील पुरुलियामध्ये एक अतिशय धक्कादायक घटना समोर आली आहे. मकरसंक्रांतीसाठी गंगासागर येथे जाणाऱ्या साधूंच्या गटाला सत्ताधारी टीएमसीशी संबंधित गुन्हेगारांनी विवस्त्र करून मारहाण केली. ममता बॅनर्जींच्या राजवटीत शाहजहानसारख्या आरोपींना राज्याकडून सुरक्षा दिली जाते आणि साधूंना बेदम मारहाण केली जाते.'

पश्चिम बंगालमध्ये हिंदू असणे हा गुन्हा - अमित मालवीय

बंगाल भाजपचे अध्यक्ष सुकांत मजुमदार यांनीही या घटनेवरून ममता बॅनर्जींवर निशाणा साधला आहे. ते म्हणाले, 'पुरुलियातील धक्कादायक घटना. गंगासागरकडे जाणाऱ्या साधूंना काही गुन्हेगारांनी मारहाण केली. यावरून पालघरमध्ये घडलेल्या घटनेची आठवण झाली. पश्चिम बंगालमध्ये हिंदू असणे हा गुन्हा आहे. भाजप खासदार लॉकेट चॅटर्जी यांनीही या घटनेवर आपली प्रतिक्रिया दिली आहे. या घटनेचा त्यांनी एका पोस्टद्वारे निषेधही केला आहे. मात्र, या घटनेवर टीएमसीकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.