प्रातिनिधिक प्रतीमा (Photo Credits: Pixabay)

काही दिवसांपूर्वी ट्रेनच्या शौचालयात चहाचे डबे सापडल्याने एकच खळबळ माजली होती. रेल्वेकडून अनेक नियम बनवूनसुद्धा प्रवाश्यांच्या आरोग्याशी खेळल्या जाणाऱ्या अशा घटनांची संख्या काही कमी होत नाही. आता याच धर्तीवर ट्रेनच्या शौचालयात खाण्या-पिण्याच्या पदार्थांसाठी वापरण्यात येणाऱ्या तसेच पाण्याच्या बाटल्या थंड ठेवण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या बर्फाच्या लाद्या सापडल्या आहेत. आश्चर्य म्हणजे या लाद्या शौचालयात असताना अनेक लोक शौचालयाचा उपयोग करत असल्याचे आढळून आले आहे.

वाराणसी-मुंबई दरम्यान धावणाऱ्या ‘कामायनी एक्स्प्रेस’मध्ये हा धक्कादायक प्रकार घडला आहे. एका व्हेंडरने रेल्वेतील खाद्यपदार्थांसाठी वापरण्यात येणाऱ्या बर्फाच्या लाद्या चक्क शौचालयात ठेवल्या होत्या. एका प्रवाशाने या प्रकाराचा व्हिडीओ तयार करून तो सोशल मिडियावर पोस्ट केला. यानंतर रेल्वेकडून या गोष्टीची तातडीने दाखल घेत या व्हेंडरवर कडक कारवाई करण्यात आल्याची माहिती मिळत आहे.

याधीही शौचालयातील पाण्याचा उपयोग करून बनवला गेलेला चहा रेल्वेमध्ये विकल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. रेल्वे प्रवासादरम्यान या प्रकारच्या अनेक घटना घडल्या आहेत, तरी रेल्वेकडून याबाबत काहीही ठोस पावले उचलली गेली नाहीत म्हणून आता भारतीय रेल्वेवर विविध प्रश्नांचा भडीमार होत आहे.