CRIME | (Image Courtesy: Archived, Edited, Symbolic Image)

स्पॅनिश क्राईम ड्रामा टीव्ही मालिका मनी हाइस्टपासुन (Money Heist) प्रेरित होऊन, एका ऑटो चालकाने पाच लोकांची टोळी तयार केली आणि खंडणीसाठी त्याच्या मंडळातील लोकांचे अपहरण करण्यास सुरुवात केली. मीडिया रिपोर्टनुसार, अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव गुंजापोगु सुरेश, गुंजापोगु सुधाकर, कुख्यात घरफोडीचा भाऊ आहे. त्याने काही लोकांचे अपहरण करून खंडणी म्हणून पैसे उकळले. पोलिसांनी सांगितले की, 6 फेब्रुवारी रोजी अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपासाअंती हाच ऑटोचालक अपहरणाच्या कटाचा सूत्रधार असल्याचे निष्पन्न झाले. या प्रकरणात आणखी चार जण आणि एका महिलेचाही समावेश आहे. जो फरार आहे.

हैदराबादच्या पश्चिम विभागाचे डीसीपी जोएल डेव्हिस यांनी मीडियाला सांगितले की, आरोपी सुरेशने स्वतःच्या ओळखीच्या वर्तुळातील लोकांना लक्ष्य केले आणि त्यांच्या किशोरवयीन मुलांचे अपहरण करण्यास सुरुवात केली. त्याने गुडीमलकापूर येथील 19 वर्षीय प्रशांतचे अपहरण करून 50 हजार रुपयांची मागणी केली. पोलीस पथकाने या प्रकरणाचा तपास करत प्रकरण उघडकीस आणण्याबरोबरच चार जणांना पकडले. (हे ही वाचा Gujarat High Court: पोलीस अधिकाऱ्याने कोर्टात प्यायले कोल्ड्रड्रिंक; न्यायाधीशांनी ठोठावली शिक्षा)

गंमत म्हणजे ऑटोचालकाने स्वतःचे नाव प्रोफेसर ठेवले होते. या नावाच्या पात्राने क्राइम टीव्ही शोमध्ये मुख्य भूमिका केली होती आणि त्याने या मालिकेनुसार बर्लिन, टोकियो, रिओ आणि नैरोबी अशी इतरांची नावेही ठेवली होती. त्यानंतर या टोळीने लोकांचे अपहरण करून खंडणी मागायला सुरुवात केली. ताज्या प्रकरणात या टोळीने 50 हजार रुपयांची मागणी केली होती. तर अन्य काही प्रकरणात त्याने लाखांची मागणी केली होती. डीसीपीने सांगितले की, एका प्रकरणात त्याने 8 लाख रुपयांची मागणी केली होती. मात्र त्याला पैसे मिळाले नाहीत. खंडणीच्या रकमेचा वापर त्याने पजेरो वाहन खरेदीसाठी केला आणि त्याच वाहनाचा त्याने अन्य गुन्हे करण्यासाठी वापर केला.