Murder | Representational Image (Photo Credits: Pixabay)

Ghaziabad Shocker: गाझियाबाद (Ghaziabad) मध्ये अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. येथील एका व्यक्तीने पत्नीची हत्या (Murder) करून मृतदेह चार दिवस घरात ठेवला. यानंतर मृतदेहातून दुर्गंधी येऊ लागल्याने आजूबाजूच्या लोकांनी पोलिसांना यासंदर्भात माहिती दिली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठलं आणि घरातून मृतदेह ताब्यात घेऊन आरोपीला अटक केली आहे. प्राप्त माहितीनुसार, मसुरी पोलीस स्टेशन हद्दीतील मिसाळ गढी परिसरातीस एका घरात एका महिलेचा मृतदेह असल्याची तक्रार पोलिसांना मिळाली होती. यानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले. घराच्या आत बेडवर महिलेचा मृतदेह पडलेला होता. मृतदेह सुमारे 4 दिवसांपासून घरात होता. त्यामुळे सर्वत्र दुर्गंधी येऊ लागली.

मिळालेल्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेला आरोपी भरत हा मूळचा हापूर येथील दरियापूर गावचा आहे. त्याने पोलिसांना चौकशीदरम्यान सांगितले की, 3 वर्षांपूर्वी सुनीता नावाची महिला त्याच्या संपर्कात आली होती. यानंतर दोघेही एकत्र राहू लागले. सुनीताचा पहिला पती मानसिंग याचा 2012 मध्ये मृत्यू झाला. दोघांनीही सुमारे वर्षभरापूर्वी लग्न केले होते. दोघांचे हे दुसरे लग्न होते. (हेही वाचा - Haryana Shocker: नवजात अर्भकाला अणकुचीदार कुंपणावर फेकेले; हरियाणा येथील क्रूर घटना)

आरोपी भरतचा पहिल्या पत्नीपासून घटस्फोट झाला होता. भरत काही दिवसांपूर्वी त्याच्या पहिल्या पत्नीला भेटला होता. भरतने पहिल्या पत्नीला काही पैसे दिले होते. भरतची दुसरी पत्नी सुनीता हिला हा प्रकार कळला. यावरून भरत आणि सुनीता यांच्यात वाद सुरू झाला.

दारूच्या नशेत केली हत्या -

वादातून 28 फेब्रुवारी रोजी भरतने दारूच्या नशेत सुनीताचा गळा आवळून खून केला. हत्येनंतर मृतदेह दोन रात्री घरातच ठेवण्यात आला होता. तो दिवसा घरी यायचा आणि मृतदेह पाहून परत कामावर जायचा. तो एका दारूच्या दुकानात सेल्समन होता. या प्रकरणी पोलिसांनी मृत महिलेचा मुलगा राहुल याच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली आहे. (हेही वाचा, Madhya Pradesh: दीड महिन्यांच्या बाळाला लोखंडी सळीने डागले, अंगावर 40 हून अधिक चटके; न्यूमोनिया आजारावर अघोरी उपचार)

एसीपी नरेश कुमार यांनी सांगितले की, 2 मार्च 2024 रोजी मोहल्ला आंबेडकर नगरमध्ये 55 वर्षीय भरतने पत्नी 51 वर्षीय सुनीताची हत्या केल्याची माहिती मिळाली होती. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह ताब्यात घेऊन आरोपीला अटक केली. मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास सुरू आहे.