Ludhiana: खळबळजनक! 1000 रुपयांसाठी घर मालकाकडून भाडेकरूची हत्या; लुधियाना येथील घटना
Image used for representational purpose

केवळ हजार रुपयांसाठी एका घर मालकाने आपल्या भाडेकरूची हत्या (Murder) केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ही घटना पंजाब (Panjab) येथील लुधियाना (Ludhiana) येथे घडली आहे. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात एकच खळबळ माजली आहे. याप्रकरणी स्थानिक पोलिसांनी घर मालकाच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करत त्याला अटक केली आहे. भाडेकरूचा मृतदेह शवविच्छेदनासाठी जवळच्या शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. तसेच याप्रकरणी पोलिसांनी अधिक चौकशीला सुरुवात केली आहे.

विजय मौर्या असे मृत व्यक्तीचे नाव आहे. विजय हा गगन नगरमध्ये गब्बर सिंह नामक व्यक्तीच्या घरात भाड्याने राहत होता. विजयचा चुलता रात्रीपाळी करून घरी परतला. पण बाहेरून अनेकदा आवाज दिला तरी, विजय दरवाजा उघडत नव्हता. यामुळे त्याच्या चुलत्याने खिडकी तोडून घरात प्रवेश केला. घरात शिरल्यानंतर त्यांना विजयचा मृतदेह बेडवर पडलेल्या अवस्थेत दिसला. त्यानंतर त्यांनी घरमालक गब्बर सिंह विरोधात स्थानिक पोलिसांत गुन्हा दाखल केला. हे देखील वाचा- कानपूर येथे एकाचवेळी आठ कुत्र्यांचा मृत्यू, शरीरात Parvo व्हायरस आढळल्याची माहिती

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विजय हा आरती स्टील कारखान्यात मशीन ऑपरेटर होता. मात्र, तो रात्री कामावरून घरी परतल्यानंतर आरोपी गब्बर सिंहने हजार रुपये चोरी केल्याच्या आरोपाखाली त्याला काठीने जबर मारहाण केली. ज्यामुळे विजयचा मृत्यू झाला आहे. पोलिसांनी घटनास्थळावरून रक्ताने माखलेली काठी जप्त केली असून पुढील कारवाईला सुरुवात केली आहे.