Two people lost their lives after three-storey hotel building collapsed in Solan (Photo Credits: ANI)

मान्सूनच्या आगमनानंतर देशातील पावसाचा जोर चांगलाच वाढला आहे. बिहार, उत्तर प्रदेश या राज्यातील इंक ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. अशात हिमाचल प्रदेश (Himachal Pradesh) मध्ये मुसळधार पावसामुळे 3 मजली इमारत कोसळल्याची धक्कादायक बातमी मिळत आहे. या इमारतीच्या ढिगाऱ्याखाली लष्कराचे 30 जवान आणि 7 नागरिक अडकले असल्याची भीती व्यक्त केली गेली होती. त्यानंतर बचावकार्याला सुरुवात झाल्यावर आतापर्यंत 23 जवानांना बाहेर काढण्यात यश आले असून, 2 मृतदेह हाती लागले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार हे जवान एके ठिकाणी जात असताना, कुम्हारहट्टी (Kumarhatti) येथील या इमारतीमध्ये असणाऱ्या धाब्यावर जेवणासाठी थांबले होते. ही इमारत एक गेस्ट हाउस होती. गेल्या काही दिवसांपासून चालू असणाऱ्या मुसळधार पावसामुळे ही इमारत पूर्णपणे खचली होती. त्यात पावसाचा जोर वाढल्याने ही इमारत कोसळली. यामध्ये 30 जवान आणि 7 इतर लोक अडकले होते. ही माहिती मिळताच स्थानिक प्रशासन आणि बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले व बचावकार्याला सुरुवात झाली. (हेही वाचा: मुसळधार पावसामुळे बिहारमध्ये पूर; चक्क प्लास्टिक ड्रमच्या बोटीतून नवरा नवरीची पाठवणी (Video))

यामध्ये आतापर्यंत 23 जणांना वाचविण्यात यश आले. 2 मृतदेह सापडले असून अजून 12 जण अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. बचाव कार्य चालूच आहे. याबाबत जगत प्रकाश नड्डा यांनी जय राम ठाकूर यांच्याशी बातचीत करून परस्थितीचा आढावा घेतला आहे. जखमींवर ताबडतोब उपचार सुरु करण्यात आले आहेत.