धक्कादायक: मांत्रिकाच्या नादाला लागून वडिलांनी केली आपल्या 5 मुलांची हत्या; पोलिसांकडून गुन्हा दाखल
प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credits: PTI)

हरियाणाच्या (Haryana) जींद जिल्ह्यातून (Jind District) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे एका वडिलांनी मांत्रिकाच्या सांगण्यावरून स्वत: च्या पाच मुलांची हत्या केली आहे. हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर आरोपी वडिलांना अटक करण्यात आली आहे. हे प्रकरण जिंद जिल्ह्यातील डिडवारा गावचे आहे. गावातील कालव्यात पाच दिवसांपूर्वी आपल्या दोन मुलींना फेकून या नराधम वडिलाने त्यांची हत्या केली होती. या मुली गायब झाल्यानंतर प्रकरणाचा पोलिसांनी तपास सुरु केला, तेव्हा ही गोष्ट समोर आली की, यापूर्वी त्याने आपल्या आणखी तीन मुलांना ठार मारले आहे. यामध्ये दोन मुली आणि एक मुलाचा समावेश होता.

तांत्रिकांच्या सांगण्यावरून या व्यक्तीने आपल्या स्वत: च्या पाच मुलांना ठार मारण्याची भीती व्यक्त केली जात आहे. 16 जुलै रोजी डिडवारा गावात राहणाऱ्या जुम्माने आपल्या दोन मुली, सात वर्षाची मुलगी निशा आणि 11 वर्षांची मुलगी मुस्कान बेपत्ता झाल्याची पोलिसात तक्रार दिली होती. दुसर्‍या दिवशी पोलिसांना  निशाचा मृतदेह गावापासून सात किलोमीटर अंतरावर कालव्यात सापडला. त्यानंतर तीन दिवसानंतर दुसरी मुलगी मुस्कानचाही मृतदेह कालव्यात सापडला. तेव्हापासून आरोपी वडील जुम्मावर पोलिसांचा संशय होता. संशयाच्या आधारे पोलिसांनी गुरुवारी रात्री जुम्माला चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. (हेही वाचा: शेजारणीशी होणाऱ्या वादातून 4 वर्षांच्या मुलाची हत्या; अंधेरी येथील महिला अटकेत)

त्यानंतर जुम्माने स्वतः आपण आपल्या 5 मुलांची हत्या केल्याचे सरपंच व गावातील इतरांना सांगितले. गावातील लोकांनी पोलिसांना या गोष्टीची माहिती दिली व आता पोलिसांनी जुम्माला अटक केली आहे. आपण एका मांत्रिकाच्या संपर्कात असल्याचेही त्याने सांगितले व तंत्रविद्येच्या नादाला लागून आपण हे कृत्य केल्याचे त्याने सांगितले. तसेच यापूर्वीही आपण आपल्या तीन मुलांना मारल्याचे त्याने काबुल केले आहे. जुम्मा मजुरी करत असून, आता त्याची पत्नी सहाव्या मुलासह गर्भवती आहेत.