Murder | Representational Image | (Photo Credits: stux/Pixabay)

एका महिलेने शेजारच्या 4 वर्षाच्या मुलाची हत्या केल्याची धक्कादायक माहिती मुंबईतून (Mumbai) समोर येत आहे. याप्रकरणी मुंबई पोलिसांनी महिलेला अटक केली आहे. हत्या केलेल्या मुलाचे कुटुंब आणि गुन्हेगार महिला अंधेरी (Andheri) येथील संतोषी माता नगर (Santoshi Mata Nagar) परिसरात शेजारी राहतात. मुलाची आई आणि गुन्हेगार महिला यांच्यात वेगवेगळ्या कारणांवरुन वारंवार भांडणे होत असतं. या रागातून सोमवारी (29 जून) रोजी महिलेने मुलाला घरात बोलावले आणि त्याचा गळा दाबला. त्यानंतर तिने बाथरुममधील पाण्याने भरलेल्या बादलीत मुलाचे डोके बुडवून ठेवले. अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. (मुंबई: नालासोपारा येथे तीन मुलांची हत्या करुन 35 वर्षीय पित्याची आत्महत्या)

या प्रकरणी पोलिसांनी महिलेला अटक केली असून तिच्यावर भारतीय दंड संहिता कलम 302 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. यापूर्वी नागपूर येथे पार्किंगच्या वादातून शेजारच्या महिलेची चाकू भोसकून हत्या करण्यात आली होती. दरम्यान किरकोळ वादातून हत्या करण्याचे प्रमाण वाढत आहे.

लॉकडाऊनच्या काळात आत्महत्येच्या देखील अनेक घटना समोर आल्या आहेत. काही दिवसांपूर्वी नालासोपारा येथील एका 35 वर्षीय व्यक्तीने 3 मुलांची हत्या करुन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पत्नी सोडून गेल्याने या व्यक्तीने टोकाचे पाऊल उचलले होते. तर अमरावती येथे विलगीकरण कक्षात ठेवलेल्या 28 वर्षीय तरुणाने गळफास घेत आपले जीवन संपवले होते. कोरोना व्हायरस संकटात अनेक अडचणी उभ्या राहिल्याने तणावातून अनेकांनी आत्महत्या करत जगाचा निरोप घेतला आहे. तर कोविड-19 च्या भीतीने देखील काहींनी आत्महत्या केली आहे.