देशात जीएसटी (GST) लागू झाल्यावर अनेक गोष्टींच्या किंमती काही प्रमाणात वाढल्या. ग्राहकांना जसा याचा फटका बसला तसाच व्यापारांनाही बसला. मात्र आता जीएसटी नेटवर्कने (GST Network) नोंदणीकृत सूक्ष्म, लघु आणि मध्यम व्यवसायासाठी एक खास सुविधा सुरू केली आहे. जीएसटीएनने आता वार्षिक 1.5 कोटी रुपये पर्यंत व्यवसाय करणाऱ्या सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना (MSME) विनामूल्य अकाउंटिंग आणि बिल बनवण्याचे सॉफ्टवेअर देऊ केले आहे. जीएसटीएनने एक परिपत्रक जारी करून याबाबत माहिती दिली आहे.
हे सॉफ्टवेअर कंपन्यांची बिले, त्यांचे अकाउंट आणि अकाउंट्सची तपशीलवार माहिती, वस्तूंचे व्यवस्थापन आणि जीएसटी रिटर्न तयार करणे यासाठी मदत करणार आहे. याबाबत बोलताना, जीएसटीएनचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश कुमार म्हणाले, ‘सरकारने घेतलेल्या या पुढाकाराने एमएसएमई डिजिटल सिस्टम बऱ्याच प्रमाणात विकसित होईल. या सॉफ्टवेअरमुळे त्यांच्या कार्यक्षमतेत वाढ होईल आणि अनुपालन भार कमी होईल. (हेही वाचा: भारतात रिकाम्या हातांची संख्या वाढली, 2016 नंतर देशात बेरोजगारीचे प्रमाण सर्वाधिक)
हे सॉफ्टवेअर, www.gst.gov.in या पोर्टलवर दिलेल्या डाउनलोड पर्यायावर क्लिक करून प्राप्त करता येईल. अंदाजानुसार सध्या जवळजवळ 80 लाख असे एमएसएमई आहेत ज्यांचे वार्षिक उत्पन्न 1.5 कोटी रुपये आहे, या सर्व लोकांना या गोष्टीचा फायदा होणार आहे.
दरम्यान, जीएसटी परिषदेने कंपन्यांमधील होणाऱ्या व्यवसायासाठी ई-बिल काढण्याच्या प्रक्रियेवर लक्ष ठेवण्यासाठी दोन उप-समूह नियुक्त केले आहेत. एक उप-समूह ई-इनव्हॉयससाठी व्यापार प्रक्रिया, धोरण आणि कायदेशीर पैलूंचे परीक्षण करेल. तर दुसरा याच्या तांत्रिक बाबी आणि इतर प्रक्रिया याबाबत आपली शिफारस देईल.