Google for India Digitisation Fund: गुगल भारतामध्ये डिजीटलायझेशनसाठी 75 हजार कोटींची गुंतवणूक करणार; सुंदर पिचई यांची घोषणा
Google CEO Sundar Pichai (Photo Credits: IANS)

माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातली जगातली अग्रगण्य असणारी गुगल (Google) कंपनीने भारतासाठी आज आनंदाची मोठी बातमी दिली आहे. 'गुगल फॉर इंडिया डिजीटलायझेशन फंड' या अंतर्गत गुगल भारतामध्ये डिजीटलायझेशनसाठी 75 हजार कोटींची गुंतवणूक करणार, अशी घोषणा गुगलचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुंदर पिचई (Sundar Pichai) यांनी केली आहे. पुढील 5-7 वर्षांमध्ये ही गुंतवणूक केली जाणार असल्याचे पिचई यांनी स्पष्ट केले आहे. ही गुंतवणूक भागीदारी, ऑप्रेशन्स आणि डिजीटलायझेशनसंदर्भातील बांधकाम क्षेत्राशी संबंधित असणार आहे, असेही पिचई यांनी म्हटले आहे. गुगल इंडियाचा वार्षिक कायक्रम यावेळी ऑनलाईन पद्धतीने पार पडला. विशेष म्हणजे, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सुंदर पिचई यांची व्हर्च्युअल बैठक झाली होती.

दरम्यान, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सुंदर पिचई यांच्यात सोमवारी सकाळीच बैठक झाली होती. भारतीय शेती आणि उद्योगांना तंत्रज्ञानाच्या माध्यमातून कसा फायदा करून देता येईल, यावर चर्चा झाल्याचे नरेंद्र मोदी म्हणाले होते. डेटा सुरक्षा आणि सायबर सुरक्षा यावरही सुंदर पिचई यांच्यासोबत चर्चा झाल्याचे मोदी म्हणाले होते. हे देखील वाचा- Maan Ki Baat: पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या 26 जुलैला 'मन की बात' च्या माध्यमातून जनतेशी साधणार संवाद

सुंदर पिचई यांचे ट्विट- 

आज भारतामधील सोयी सुविधांचा दर्जा वाढवण्यासाठी डिजीटलायझेशन फंडची घोषणा करताना मला आनंद होत आहे. आम्ही वेगवेगळ्या माध्यमातून येत्या 5-7 वर्षांमध्ये भारतात 75 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहोत. आम्ही इक्विटीच्या माध्यमातून, भागीदारीमधून तसेच ऑप्रेशनल क्षेत्रामधून गुंतवणूक करणार आहोत. याच प्रमाणे डिजीटलायझेशनसंदर्भातील बांधकाम आणि इकोसिस्टीम (व्यवस्था) निर्माण करण्यासाठी गुंतवणूक करण्यात येईल. आम्हाला भारताच्या भविष्यावर आणि त्याच्या डिजीटल अर्थव्यवस्थेवर विश्वास आहे हेच या गुंतवणूकीमधून दिसून येत आहे, अस पिचई यांनी आपल्या ब्लॉगमध्ये म्हटले आहे.