Tomato Prices: सर्वसामान्यांसाठी दिलासादायक बातमी! आजपासून टोमॅटो 50 रुपये किलोने विकला जाणार;  NCCF आणि NAFED ला सूचना
Tomato | Representational image (Photo Credits: pxhere)

Tomato Prices: ग्राहक व्यवहार विभागाने NCCF आणि NAFED ला 15 ऑगस्ट 2023 पासून टोमॅटो 50 रुपये प्रति किलो या किरकोळ दराने विकण्याचे निर्देश दिले आहेत. घाऊक बाजारात टोमॅटोचे भाव कमी होत असल्याने विभागाने हा निर्णय घेतला आहे. NCCF आणि NAFED द्वारे दिल्ली-NCR मध्ये टोमॅटोची किरकोळ विक्री 14 जुलै 2023 पासून सुरू झाली. ऑगस्ट 2023 मध्ये दोन्ही एजन्सींकडून 13 ऑगस्ट 2023 पर्यंत एकूण 15 लाख किलो टोमॅटो खरेदी करण्यात आले होते, जे देशातील प्रमुख टोमॅटो वापर केंद्रांवर किरकोळ ग्राहकांना प्रदान करण्यात आले होते. या स्थानांमध्ये दिल्ली-एनसीआर, राजस्थान (जयपूर, कोटा), उत्तर प्रदेश (लखनौ, कानपूर, वाराणसी, प्रयागराज) आणि बिहार (पाटणा, मुझफ्फरपूर, आराह, बक्सर) यांचा समावेश आहे.

NCCF आणि NAFED द्वारे खरेदी केलेल्या टोमॅटोची किरकोळ किंमत सुरुवातीला 90 रुपये प्रति किलो ठरवण्यात आली होती आणि नंतर 16 जुलैपासून 80 रुपये प्रति किलो आणि 20 जुलैपासून 70 रुपये प्रति किलोपर्यंत कमी करण्यात आली होती. आता टोमॅटोचे दर 50 रुपये किलो झाले आहेत. त्यामुळे आता ग्राहकांना मोठा दिलासा मिळणार आहे. (हेही वाचा - Tomato Price: टोमॅटोच्या किंमतीत घसरण झाल्याने सर्वसामान्यांना मोठा दिलासा)

गेल्या काही दिवसांत, NCCF ने संपूर्ण दिल्लीतील 70 ठिकाणी आणि नोएडा आणि ग्रेटर नोएडामधील 15 ठिकाणी मोबाइल व्हॅन तैनात करून किरकोळ ग्राहकांना पुरवल्या जाणाऱ्या टोमॅटोच्या प्रमाणात लक्षणीय वाढ केली आहे. याशिवाय NCCF ओपन नेटवर्क फॉर डिजिटल कॉमर्स (ONDC) प्लॅटफॉर्मद्वारे टोमॅटोची किरकोळ विक्री देखील करत आहे.

ग्राहक व्यवहार विभागाच्या सूचनेवरून NCCF आणि NAFED ने आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि महाराष्ट्रातील मंडईतून टोमॅटोची खरेदी सुरू केली होती. गेल्या महिनाभरात टोमॅटोच्या दरात सर्वाधिक वाढ झालेल्या भागातील ग्राहकांना ते कमी दरात उपलब्ध करून देण्यात आले आहे.