विमानातील टॉयलेटमध्ये तब्बल २६ लाख रुपयांचं सोनं
(संग्रहीत आणि संपादित प्रतिमा)

गोव्यातील दाबोळी विमानतळ कस्टम विभागाने कारवाई करत तब्बल २६ लाख रुपये किमतीचं सोनं जप्त केलं आहे. कस्टम अधिकाऱ्यांनी धावपट्टीवर उभ्या असलेल्या एअर इंडियाच्या एआय-९९४ या विमानाची तपासणी सोमवारी रात्री केली. यावेळी अधिकाऱ्यांना विमानाच्या शौचालयात कमरपट्टा आढळून आला. त्यात तब्बल ९२९ ग्रॅम इतक्या वजनाचं सोनं सापडलं. आंतरराष्ट्रीय बाजारभावाप्रमाणे या सोन्याची किंमत २६ लाख रुपयांहून अधिक असल्याचे समजते.

शौचालयात सापडलेला कमरपट्टा अधिकाऱ्यांनी फाडला. अधिकाऱ्यांना या पट्ट्यात पावडर स्वरुपात सोनं असल्याचं आढळून आलं. अधिकाऱ्यांनी पट्ट्यासहीत सर्व ऐवज जप्त केला. या सर्व सोन्याचे वजन ९२९ ग्रॅम इतके भरले. अधिकाऱ्यांनी प्रवाशांकडे कमरपट्टा कोणाचा आहे अशी विचारणा केली असता, या पठ्ठ्यावर कोणीही मालकी हक्क सांगितला नाही. त्यामुळे या पट्टाप्रकरणात अधिकाऱ्यांनी कोणत्याच प्रवाशाला ताब्यात घेता आले नाही.

गेल्या काही दिवसांत दाबोळी विमानतळावर कस्टम विभागाने कारवाई तीव्र केली आहे. त्यामुळे अवैध मार्गाने भारतात आणलेलं सुमारे १ कोटी ३० लाखांच सोनं, १४ लाखांचं विदेशी चलन तसेच, सुमारे २५ लाख रुपयांच व्यापारी साहित्य जप्त केल्याचे वृत्त प्रसारमाध्यमांनी दिले आहे.