अजब : प्रवाश्यांचे सामान न घेताच विमान पोहचले इच्छित स्थळी
प्रातिनिधिक प्रतिमा (Image: Twitter, @goairlinesindia)

विमान कंपनी गो एअर (GoAir) कडून अजून एक निष्काळजीपणाची बाब समोर आली आहे. मिळालेल्या वृत्तानुसार, गो एअरच्या एका विमानाने चक्क प्रवाश्यांचे सामान न घेताच श्रीनगर वरून जम्मूसाठी उड्डाण केले आणि आपल्या इच्छित ठिकाणी पोहचले. विमान पोहचल्यानंतर प्रवाश्यांचा ही गोष्ट लक्षात आली, त्यानंतर प्रवाश्यांमध्ये प्रचंड नाराजी पसरली होती. मात्र आपले समान परत मिळवण्यासाठी प्रवाश्यांना खूप वेळ वाट पहावी लागली.

मिळालेल्या माहितीनुसार, या विमान प्रवासातील एक प्रवासी अब्दुल हामिदने जम्मूवरून फोन करून ‘पीटीआय भाषा’ला या संदर्भातील माहिती दिली आणि सांगितले की, गो एयरचे विमान जी8-213 हे श्रीनगरवरून जम्मूला पोहचले मात्र कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी आमचे सामान विमानात चढवलेच नाही. (हेही वाचा : रेल्वेमध्ये खाण्यापिण्याच्या गोष्टींसाठी वापर करण्यात येत आहे चक्क शौचालयात ठेवण्यात आलेला बर्फ)

जेव्हा विमान जम्मूला पोहचले त्यावेळी प्रवाश्यांना बराच वेळ ताटकळत बसून ठेवले, मात्र त्यांना कोणतेही कारण सांगितले नाही. बराचवेळानंतर त्यांना त्यांचे सामान विमान कर्मचाऱ्यांनी आपल्या सोबत आणलेच नाही ही माहिती देण्यात आली. प्रवाश्यांनी गोंधळ घातल्यानंतर पुढच्या विमानाने सामान येत असल्याचे सांगण्यात आले. मात्र प्रवाश्यांनी जवळजवळ 1 तास वाट पाहून परत विचारणा केली असता, ‘समान घेण्यासाठी उद्या या’ असे उत्तर गो एयरकडून देण्यात आले.