Imaged used for representational purpose only | (Photo Credits: Twitter/@goairlinesindia)

GoAir कंपनीच्या देशांतर्गत उड्डाणांसाठी (Domestic Flights) 15 एप्रिल 2020 पासून तर आंतरराष्ट्रीय विमानांच्या (International Flights) तिकीट बुकिंगला (Booking) 1 मे 2020 पासून सुरुवात होणार आहे. यासंदर्भात गोएअरच्या प्रवक्त्यानी माहिती दिली आहे. कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशांतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय विमान सेवा बंद करण्यात आली आहे. लॉकडाऊन काळात केवळ अत्यावश्यक सेवा पुरवणाऱ्या मालवाहतूक विमानांना परवानगी देण्यात आली आहे.

दरम्यान, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या देशात 14 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन जाहीर करण्यात आले आहे. सरकारी विमान कंपनी एअर इंडियाने 30 एप्रिलपर्यंत तिकिट बुकिंग बंद केली आहे. त्यामुळे एअर इंडियाची देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय विमान सेवा बंद असणार आहे. एअर इंडियाकडून याबाबत माहिती देण्यात आली आहे. (हेही वाचा - अमेरिकेमध्ये Bronx Zoo मध्ये वाघिण COVID-19 पॉझिटिव्ह आढळल्यानंतर भारतात प्राणिसंग्रहालयांना हाय अलर्ट जारी; प्राण्यांवर सीसीटीव्हीच्या माध्यमातून 24x7 ठेवली जाणार नजर)

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी 25 मार्चपासून 21 दिवसांच्या लॉकडाऊनची घोषणा केली होती. त्यामुळे येत्या 14 एप्रिलपर्यंत देशात लॉकडाऊन पाळण्यात येत आहे. म्हणून सध्या 14 एप्रिलपर्यंत देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय विमान सेवा बंद आहे. भारतात कोरोनाग्रस्त रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. सध्या देशात 4 हजार हून अधिक लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. तसेच 100 पेक्षा जास्त जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.