दिल्ली (Delhi) रोहिणी न्यायालयाच्या गोळीबारातील आरोपी तुरुंगात असलेला गुंड टिल्लू ताजपुरिया (Tillu Tajpuriya) याचा मंगळवारी तिहारच्या (Tihar Jail) मंडोली तुरुंगात प्रतिस्पर्धी टोळीच्या सदस्यांनी हल्ला केल्याने मृत्यू झाला, असे तुरुंग अधिकाऱ्यांनी सांगितले. पोलीस सूत्रांनी सांगितले की, प्रतिस्पर्धी जितेंदर गोगी टोळीचा शार्प शूटर असल्याचा आरोप असलेल्या योगेश उर्फ टुंडा आणि त्याचा साथीदार दीपक तीतर यांनी ताजपुरिया याच्यावर लोखंडी रॉडने हल्ला करत त्याची हत्या केली.
यानंतर ताजपुरियाला दिल्लीतील दीनदयाल उपाध्याय रुग्णालयात नेण्यात आले, तेथे त्याला मृत घोषित करण्यात आले, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. हॉस्पिटलच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, गुंडाला बेशुद्ध अवस्थेत आणण्यात आले आणि सकाळी साडेसहा वाजता त्याला मृत घोषित करण्यात आले. या घटने पोलीस सध्या तपास सुरु आहे.
टिल्लू ताजपुरिया हा दिल्लीतील एका कुख्यात गुन्हेगारी टोळीचा प्रमुख होता आणि मोस्ट वॉन्टेड गँगस्टर जितेंद्र गोगीच्या नेतृत्वाखालील आणखी एका तितक्याच कुख्यात टोळीचा कट्टर प्रतिस्पर्धी होता. 24 सप्टेंबर 2021 रोजी, वकिलांच्या वेशात आलेल्या ताजपुरियाच्या दोन सहकाऱ्यांनी दिल्लीच्या रोहिणी कोर्टातील कोर्टरूममध्ये गोगीची गोळ्या झाडून हत्या केली होती. गोगीचा जागीच मृत्यू झाला, तर त्याच्या दोन मारेकऱ्यांना कोर्टरूममध्ये पोलिसांनी गोळ्या घालून ठार केले. ताजपुरिया, जो आधीच दुसर्या गुन्ह्यासाठी तुरुंगात होता, त्याची मुख्य सूत्रधार म्हणून चौकशी करण्यात आली.
गोगी आणि ताजपुरिया टोळ्यांमध्ये सुमारे एक दशकापासून गँगवार आहे. या 10 वर्षात दोन गटांमध्ये झालेल्या संघर्षात दोन डझनहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. अटक करण्यात आलेल्या दोन टोळ्यांमधील सदस्यांवर कॉन्ट्रॅक्ट किलिंग, खंडणी, दरोडा आणि कार हायजॅकिंगच्या गुन्ह्यांमध्ये सहभाग आहे.