Dr KK Aggarwal (PC - Twitter)

Dr KK Aggarwal Passes Away: इंडियन मेडिकल असोसिएशन (IMA) चे माजी अध्यक्ष आणि पद्मश्री-सन्मानित डॉक्टर केके अग्रवाल यांचे कोरोना विषाणूमुळे निधन झाले आहे. काल रात्री साडेअकरा वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला. यासंदर्भात केके अग्रवाल यांच्या कुटुंबीयांनी माहिती दिली आहे. केके अग्रवाल हे 62 वर्षांचे होते आणि एका आठवड्यापासून ते व्हेंटिलेटरवर होते.

केके अग्रवाल यांच्या कुटुंबीयांनी आज सकाळी त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून ट्विट करुन त्यांच्या मृत्यूची माहिती दिली आहे. कोरोनाचा संसर्ग झाल्यानंतर केके अग्रवाल यांना राजधानी दिल्लीतील एम्समध्ये दाखल करण्यात आले होते. तिथे बरेच दिवस त्यांच्यावर उपचार सुरू होते, परंतु त्यांची कोरोना विरुद्धची लढाई अपयशी ठरली. (वाचा - Dr KK Aggarwal यांनी एकट्याने कोविड-19 लस घेतल्याने नाखुश पत्नीने फोनवरच घेतला समाचार; व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पद्मश्री विजेत्या डॉक्टरांनी दिले 'हे' स्पष्टीकरण)

यावर्षी जानेवारीत केके अग्रवाल यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. व्हिडिओमध्ये केके अग्रवाल यांची पत्नी त्यांना फटकारताना दिसली होती. डॉ. अग्रवाल लाईव्ह स्ट्रिमिंग करत असताना त्यांना त्यांच्या पत्नीचा फोन आला. ते फोनवर आपल्या पत्नीला सांगत होते की, त्यांनी कोविड-19 लस घेतली असून त्यांच्या पत्नीनेही सोमवारी लस घ्यावी. तुम्ही मला तुमच्यासोबत का नेले नाही? तुम्ही माझ्याशी खोटं बोलू नका. असे प्रश्न त्यांची पत्नी त्यांना वारंवार विचारत होती. यावर डॉक्टर म्हणाले की, लस कुठे मिळते हे पाहण्यासाठी ते गेले होते. परंतु, केंद्रावर गर्दी नसल्याने आरोग्यसेवकांनी लस घेण्यास सांगितले आणि त्यांनी होकार दिला. या संभाषणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर खूपचं व्हायरल झाला होता.

दरम्यान, डॉ. केके अग्रवाल यांचे एक यूट्यूब चॅनलही होते, ज्यावर ते व्हिडिओ बनवून लोकांना कोरोना विषाणूंसह इतर अनेक आजारांबद्दल माहिती व सल्ले देत असतं. डॉ. अग्रवाल सुमारे दोन आठवड्यांपूर्वी कोरोनामुळे संक्रमित झाले होते. त्यानंतर त्यांना व्हेंटिलेटर सपोर्टवर ठेवण्यात आले होते. डॉ. केके अग्रवाल ह्रदयरोग तज्ज्ञ आणि भारतीय हार्ट केअर फाउंडेशन ऑफ इंडियाचे प्रमुख होते. अग्रवाल यांना 2010 साली पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.