Haryana Shocker: धक्कादायक! आधी पत्नीचे हात कापले, नंतर डोकं चिरलं आणि मृतदेह पेटवून दिला; आरोपी पतीला अटक
Murder | Representational Image | (Photo Credits: Pixabay)

Haryana Shocker: हरियाणातील मानेसर जिल्ह्यातील एका 34 वर्षीय व्यक्तीला पोलिसांनी पत्नीची हत्या केल्याप्रकरणी अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या व्यक्तीने आधी पत्नीचे हात कापले, नंतर तिचे डोके चिरले आणि मृतदेह पेटवून दिला. आरोपीने पत्नीची हत्या केल्याची कबुली दिली आहे, अशी माहिती पीटीआय या वृत्तसंस्थेने दिली आहे. प्राप्त माहितीनुसार, 21 एप्रिल रोजी मानेसरमधील एका गावात एका महिलेचा अर्धवट जळालेला मृतदेह सापडला होता. पोलिसांनी तिची हत्या झाल्याचा संशय व्यक्त केला होता. महिलेचे डोके गायब होते आणि तिचे हात कापले गेले होते.

दरम्यान, 23 एप्रिल रोजी पोलिसांना महिलेचे कापलेले हात सापडल्यानंतर या हत्येचा धक्कादायक तपशील समोर आला. 26 एप्रिल रोजी या महिलेचे कापलेले शीर सापडले. पोलिसांनी तपासात हे धड 30 वर्षीय महिलेचे असल्याचा निष्कर्ष काढला. मात्र, हत्येमागील कारण अद्याप समजू शकलेले नाही. (हेही वाचा -Bengaluru: ऐकावं ते नवलचं! 12 वीला कमी मार्क्स मिळाल्याने घरमालकाने भाडेकरूला नाकारले; काय आहे नेमकी प्रकरण? जाणून घ्या)

गुरुग्रामचे पोलिस आयुक्त कला रामचंद्रन यांनी सांगितले की, आरोपी जितेंद्रची चौकशी सुरू असून शुक्रवारी अधिक तपशील शेअर केला जाईल. जितेंदर हा गांधी नगरचा रहिवासी असून तो मानेसर भागात भाड्याने राहत होता, असे एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने पीटीआयला सांगितले.

कुकडोला गावातील रहिवासी उमेद सिंग यांनी भाडेतत्त्वावर घेतलेल्या शेतात बांधलेल्या दोन खोल्यांपैकी एका खोलीत पोलिसांना महिलेचा मृतदेह आढळला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पाचगाव चौकातून कासन गावाकडे जाणाऱ्या रस्त्याच्या कडेला उमेदसिंग यांनी आठ एकर जमीन भाडेतत्त्वावर घेतली होती. अर्धवट जळालेला मृतदेह सापडल्यानंतर उमेद सिंग यांनीच पोलिसांना याबाबत माहिती दिली.

माझ्या शेजाऱ्याने मला फोन केला आणि मला सांगितले की त्याने माझ्या शेतातील एका खोलीतून धूर निघत असल्याचे पाहिले. मी जेव्हा शेतात गेलो तेव्हा मला खोलीत अर्धे जळालेले धड दिसले आणि मी पोलिसांना कळवले, असं उमेद सिंग यांनी सांगितलं. उमेद सिंग यांच्या तक्रारीवरून, मानेसर पोलिस स्टेशनमध्ये आयपीसीच्या कलम 302 (हत्या) आणि 201 (पुरावा लपवणे) अंतर्गत एफआयआर नोंदवण्यात आला आहे.