Delhi Shahdara shooting incident (फोटो सौजन्य -X/ANI)

Delhi Shahdara Shooting Incident: दिल्लीतील शाहदरा (Shahdara) भागातील फरश बाजार (Farsh Bazar) परिसरात गुरुवारी रात्री झालेल्या गोळीबारात (Firing) दोन जणांचा मृत्यू झाला, तर एक 10 वर्षांचा मुलगा जखमी झाला. दिल्ली पोलिसांनी (Delhi Police) दिलेल्या माहितीनुसार, 40 वर्षीय आकाश शर्मा उर्फ ​​छोटू आणि त्याचा 16 वर्षीय पुतण्या ऋषभ शर्मा यांचा गोळीबारामुळे मृत्यू झाला. दरम्यान, आकाशचा 10 वर्षांचा मुलगा क्रिश शर्मा यालाही गोळ्या लागल्या. सर्वजण आपापल्या घराबाहेर दिवाळी साजरी करत असताना ही घटना घडली आणि रात्री आठच्या सुमारास दोन सशस्त्र व्यक्तींनी त्यांच्यावर हल्ला केला. रात्री साडेआठच्या सुमारास पोलिसांना या घटनेची माहिती मिळाली, त्यानंतर पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले. घटनास्थळी पोहोचल्यानंतर पोलिसांच्या पथकाला कुटुंबातील सदस्य रक्ताच्या थारोळ्यात पडलेले दिसले.

दरम्यान, हल्लेखोरांनी हल्ला करण्यापूर्वी आकाश शर्माच्या पायाला स्पर्श केल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. या गोळीबारात जवळच उभा असलेला आकाशचा मुलगा क्रिश आणि पुतण्या ऋषभ हेही जखमी झाले. पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, आकाश आणि ऋषभ यांना रुग्णालयात नेण्यात आले, तेथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले, तर क्रिशवर अद्याप उपचार सुरू आहेत. (हेही वाचा - Delhi Firing Video: दिल्लीत प्रसिध्द दुकानावर गोळीबार; गुन्हा दाखल, घटना सीसीटीव्हीत कैद)

वैयक्तिक वैमनस्य असल्याचा पोलिसांना संशय -

एफआयआर तपासात पोलिसांनी वैयक्तिक वैमनस्य असल्याचा संशय व्यक्त केला आहे. पीडितांच्या कुटुंबीयांचे जबाब नोंदवण्यात येणार असून या प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे. या हत्याकांडामुळे स्थानिकांना धक्का बसला असून परिसरात निराशेचे वातावरण निर्माण झाले आहे. आरोपींना लवकरात लवकर अटक व्हावी यासाठी पोलीस या घटनेमागील हेतू शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. (हेही वाचा - Firing Incident at Badlapur Railway Station: बदलापूर हादरले! रेल्वे स्थानकावर गोळीबाराची घटना, पोलिसांकडून तपास सुरु)

तथापी, या घटनेमुळे दिल्लीतील कायदा आणि सुव्यवस्थेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. यापूर्वी अज्ञात व्यक्तींनी गोळीबाराच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. या प्रकरणाची सखोल चौकशी केली जाईल आणि कायदेशीर प्रक्रियेनुसार दोषींवर कारवाई केली जाईल, असं पोलिसांनी सांगितलं आहे.