Andhra Pradesh: चंद्रबाबू नायडू यांच्याविरोधात FIR दाखल; कोरोनाच्या नवीन व्हेरिएंटसंदर्भात अफवा पसरविल्याचा आरोप
Chandrababu Naidu (PC - Facebook)

Andhra Pradesh: भारत कोरोनाच्या आणखी एक प्राणघातक लाटेचा सामना करत आहे. अशातचं आता तेलगू देसम पार्टी (टीडीपी) प्रमुख चंद्रबाबू नायडू (Chandrababu Naidu) यांच्याविरोधात N440K स्ट्रेन संदर्भात जनतेत दहशत निर्माण केल्याबद्दल एफआयआर दाखल करण्यात आला आहे. आंध्र प्रदेशच्या कुरनूल शहरातील पोलिस ठाण्यात भारतीय दंड संहिता कलम 188 आणि 505 (1) (2) (2) व आपत्ती व्यवस्थापन कायद्याच्या कलम 54 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कुर्नूल शहरातील एम सुब्बैया यांनी नायडू यांच्याविरूद्ध तक्रार दाखल केली आहे. यात त्यांनी चंद्रबाबू नायडू यांनी कुर्नूलमधील लोकांमध्ये भीती निर्माण केली असल्याचा आरोप केला आहे. N440K या स्ट्रेनचे अद्याप रुग्ण असून तो इतर स्ट्रेनपेक्षा अधिक प्राणघातक आहे, अशी अफवाही नायडू यांनी पसरवल्याचं सुब्बैया यांनी म्हटलं आहे. (वाचा - सरकारचा मोठा निर्णय! ब्रिटनला जाणारे Covishield लसीचे 50 लाख डोस भारतात वापरण्यात येणार)

दरम्यान, आंध्र प्रदेशच्या कुरनूल येथे परिवहन आणि माहिती आणि जनसंपर्क मंत्री पेर्नी वेंकटरमैया यांनी N440K व्हेरिएंटसंदर्भातील माजी मुख्यमंत्र्यांच्या दाव्याचे खंडन केले आहे. त्यांनी चंद्रबाबू नायडू यांचे वर्णन कोरोना विषाणूपेक्षा जास्त धोकादायक असल्याचे केले आहे. गुरुवारी पत्रकार परिषदेत बोलताना मंत्री म्हणाले, राज्य सरकार वैद्यकीय सेवा देण्यासाठी सतत प्रयत्न करत आहे. त्याचवेळी चंद्रबाबू नायडू सरकारवर खोटे आरोप करून अफवा पसरवत आहेत आणि लोकांना भीती दाखवून राज्याची प्रतिमा ढासळ्याचा प्रयत्न करीत आहेत.

त्यांनी पुढे बोलताना सांगितलं की, आंध्र प्रदेशात N440K व्हेरिएंट विषाणूचा प्रसार होण्याची कोणतीही पुष्टी झालेली नाही. शास्त्रज्ञांनीही भारतात B.1.617 विषाणू वगळता इतर कोणताही विषाणू अस्तित्वात नसल्याची पुष्टी केली आहे. चंद्रबाबू नायडू कोरोना विषाणूवरून राजकारण करत असून या परिस्थितीचा फायदा घेण्याचा प्रयत्न करीत आहेत, असंही वेंकटरमैया यांनी सांगितलं आहे.