Ankhi Das Step Down from Her Post: फेसबुक (Facebook) च्या इंडिया पॉलिसी पॅनेलच्या प्रमुख अंखी दास (Ankhi Das) यांनी आपल्या पदावरून पायउतार होण्याचा निर्णय घेतला आहे. आज एका रिपोर्टमध्ये असा दावा करण्यात आला आहे की, अंखी दास यांनी आपला राजीनामा पत्र सादर केले आहे. ज्यात त्यांनी फेसबुकवर 9 वर्षांचा कार्यकाळ संपुष्टात आल्याची पुष्टी केली. अहवालानुसार, अंखी दास यांनी कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी मार्क झुकरबर्ग यांचे आभार मानले आहेत. स्वतःवर लावण्याता आलेल्या आरोपानंतर अंखी दास यांनी राजीनामा दिला आहे. काँग्रेसने फेसबुक मुख्यालयात अंखी दास यांच्या विरोधात तक्रार दाखल केली होती. त्यानंतर त्या नव्या वादात सापडल्या आहेत. अंखी दास यांच्यावर द्वेषयुक्त कंटेंट ब्लॉक करत भाजपाची बाजू घेतल्याचा आरोप होता. त्यामुळे काँग्रेसने मार्क झुकरबर्ग यांना यासंदर्भात लेखी तक्रार दिली होती.
अमेरिकन वृत्तपत्र वॉल स्ट्रीट जर्नलमध्ये प्रसिद्ध झालेल्या अहवालात असा दावा केला गेला आहे की, अंखी दास यांनी भाजपच्या आमदाराच्या द्वेषयुक्त भाषणाच्या पोस्टवर कारवाई करण्यास आपल्या टीमला प्रतिबंधित केले होते. भाजप नेत्यांविरोधात कारवाई केल्यास व्यवसायाचे नुकसान होईल, असे त्यांनी म्हटले होते. (हेही वाचा - Chirag Paswan Viral Video: वडील रामविलास पासवान यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी मुलगा चिरागने केली रिहर्सल; पहा व्हायरल व्हिडिओ)
या अहवालानंतर विरोधकांनी मोदी सरकारवर निशाणा साधला होता. काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनीही फेसबुक आणि व्हॉट्सअॅप हे भाजपा-आरएसएसच्या नियंत्रणाखाली असल्याचे म्हटले होतं. तसेच खोटी बातमी व द्वेष पसरवून भाजप मतदारांना आकर्षित करत असल्याचंही राहुल गांधी यांनी म्हटलं आहे.
अंखी दास यांच्या राजीनाम्यानंतर फेसबुक इंडियाचे विधान समोर आले आहे. असं म्हटलं जात आहे की, अंखी दास आपले भविष्य सार्वजनिक सेवेत घालवणार आहेत. फेसबुक इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक अजित मोहन यांनी सांगितलं की, “सार्वजनिक सेवेत आपले भविष्य घडविण्यासाठी अंखी यांनी फेसबुकचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे.”