Suicide प्रतिकात्मक प्रतिमा (PC - Pixabay)

Etawah Shocker: उत्तर प्रदेशातील इटावा मध्ये आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्याने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. सायबर गुन्हेगारांना बळी पडलेल्या प्रशांत कुमार शर्मा (३७) या तरुणाने आत्महत्या केली आहे. हे प्रकरण कोतवाली परिसरातील छाराहा या जुन्या शहरातील आहे. मृताच्या कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रशांत कुमार शर्मा हे २०१४ पासून बडपुरा तालुक्यात आरोग्य विभागात प्रकल्प व्यवस्थापक म्हणून कार्यरत होते. मंगळवारी सायंकाळी त्याने घराच्या दुसऱ्या मजल्यावरील बाथरूममध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. मृताचे वडील नाथी लाल शर्मा यांनी सांगितले की, मुलासोबत सायबर फ्रॉड झाला होता. मृत्यूपूर्वी त्याने सुमारे तीन लाख रुपयांची फसवणूक झाल्याचे सांगितले होते. यानंतर जेव्हा सायबर गुन्हेगारांना पैसे देण्यात आले तेव्हा त्यांनी नंतर त्याला ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली. न्यूड फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन ब्लॅकमेलर गेल्या वर्षभरापासून पैसे उकळत होता. त्यामुळे ते डिप्रेशनमध्ये होते. या प्रकरणाची माहिती सायबर क्राईम विभागाला देण्यात आली, मात्र कोणतीही कारवाई झाली नाही.

"माझा मुलगा घरी आला तेव्हा त्याने काही वेळाने आत्महत्या केली. मृताची भाची दीक्षा त्रिपाठी म्हणाली कि, 'माझ्या मामाला कोणीतरी ब्लॅकमेल करत होते आणि सतत पैशांची मागणी करत होते. त्यामुळे माझ्या मामावरही खूप कर्ज होतं. याबाबत तक्रारही दाखल करण्यात आली होती, कोणतीही कारवाई न झाल्याने माझ्या मामाने वैतागून आत्महत्या केली.

जिल्हा रूग्णालयात तैनात डॉक्टरांनी सांगितले की, मृतव्यक्तीला त्याच्या कुटुंबियांनी रुग्णालयात आणले होते, परंतु तो आधीच मरण पावला होता. या प्रकरणाची माहिती पोलिसांना देण्यात आली आहे. सध्या पोलिस अधिकारी या प्रकरणी काहीही बोलण्यास टाळाटाळ करताना दिसत आहेत. दरम्यान, मृत प्रशांत कुमार यांचे शवविच्छेदन करण्यात येत आहे.