UPSC परीक्षांची वयोमर्यादा 32 वरुन 27 करण्याची निती आयोगाची शिफारस
प्रतिकात्मक फोटो (Photo Credits: Unsplash)

2022-23 पर्यंत होणाऱ्या नागरी सेवा परीक्षेची वयोमर्यादा 32 वर्षांवरुन 27 वर्ष करण्यात यावी अशी शिफारस निती आयोगाने केंद्र सरकारकडे केली आहे. ही कमी झालेली वयोमर्यादा सर्वसाधारण श्रेणीतील उमेदवारांसाठी लागू करण्यात यावी असेही निती आयोगाने यात म्हटले आहे.

'स्ट्रॅटजी फॉर न्यू इंडिया @ 75' दस्तावेज सादर करण्यात आला. यात लोकसेवा परीक्षांध्ये फेरबदल करण्याची आणि अधिकाऱ्यांच्या व्यवस्थेची फेरमांडणी करण्याची गरज असल्याचे म्हटले आहे. तसंच नव्या अधिकाऱ्यांची नियुक्ती, प्रशिक्षण आणि निवड परीक्षेत काही बदल करण्याची गरज असल्याचेही निती आयोगाने म्हटले आहे. विविध विभागांमध्ये नवीन अधिकाऱ्यांची वयानुसार नियुक्ती करण्यात यावी, असे मत निती आयोगाने व्यक्त केले आहे.

नागरी सेवेसाठी असणाऱ्या विविध परीक्षांऐवजी एकच परीक्षा करण्यात यावी. राज्यांनी देखील या परीक्षा प्रक्रीयेला सकारात्मक प्रतिसाद द्यावा, असे दस्तावेजात म्हटले आहे. ठराविक विषयामध्ये प्रावीण्य मिळविणाऱ्या अधिकाऱ्यांना त्यांच्या क्षमतेनुसार योग्य जागी नियुक्त करावे, असे निती आयोगाचे म्हणणे आहे.

नागरी सेवांमध्ये सुधारणा ही सतत चालणारी प्रक्रीया आहे आणि या संदर्भातील अनेक निर्णय घेण्यात वर्तमान सरकारकडून पुढाकार घेण्यात आला आहे.