महाराष्ट्रात पुन्हा कोरोना वायरसचा कहर सुरू झाला आहे. वाढता प्रादुर्भाव पाहता यावर्षी देखील ऐन परीक्षांच्या काळात कोरोना झपाट्याने पसरत असल्याने त्याचा फटका विद्यार्थ्यांनाही बसण्याची शक्यता आहे. कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठाने पुन्हा त्यांच्या परीक्षा स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. यंदाच्या हिवाळी सत्रातील प्रलंबित परीक्षा आता कोविड 19 मुळे पुन्हा स्थगित केल्या जात असल्याचं विद्यापीठाने सांगितले आहे. दरम्यान यंदा 6-12 एप्रिल च्या काळात होणार्या या परीक्षा स्थगित करण्यात आल्या आहेत. Shivaji University Kolhapur: शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर ‘NAAC’ मानांकनात ‘ए-प्लस प्लस’.
यंदा शैक्षणिक वर्ष 2020-21 मध्ये ऑक्टोबर/नोव्हेंबर 2020 हिवाळी सत्रातील सर्व परीक्षा कॉलेज आणि विद्यापीठांमध्ये 22 मार्चपासून ऑनलाईन, ऑफलाईन स्तरावर सुरू झाल्या पण अचानक राज्यात पुन्हा कोविड 19 प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर नियम कडक करण्यात आल्याने काल रात्री उशिरा विद्यापीठाने 6-12 एप्रिल या काळातील परीक्षा स्थगित करणार असल्याचं जाहीर केले आहे. परिपत्रकामध्ये परीक्षांच्या नव्या तारखा यशावकाश सुरू करणार असल्याचं सांगण्यात आले आहे. इथे पहा विद्यापीठाचं परिपत्रक.
दरम्यान सध्या राज्यात 1ली ते 8वीच्या विद्यार्थ्यांना विना परीक्षा सरसकट उत्तीर्ण केले जाणार असल्याचं सांगण्यात आले आहे. तर 9वी ते 12वी च्या विद्यार्थ्यांच्या परीक्षेबाबत निर्णय घेण्यासाठी आज शिक्षण विभागाची महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे. यामध्ये परीक्षांबाबत काय निर्णय होणार याकडे पालक, शिक्षक आणि विद्यार्थ्यांचं लक्ष लागलं आहे.