RRB Railway Recruitment 2020: सध्या संपूर्ण देशाला कोरोना व्हायरसने विळखा घातला आहे. कोरोना व्हायरस विरोधातील लढाई जिंकण्यासाठी शासकीय तसेच प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाल्या आहेत. यात भारतीय रेल्वेने देखील पुढाकार घेतला आहे. त्यामुळे रेल्वे विभागाने रेल्वेत विविध वैद्यकीय पदांसाठी भरती जाहीर करण्याचा निर्णय घेतला आहे. दक्षिण रेल्वेमध्ये 600 पेक्षा अधिक पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. विशेष म्हणजे या सर्व पदांवर कोणत्याही प्रकारची लेखी परिक्षा असणार नाही. उमेदवाराच्या पात्रतेनुसार त्याची थेट निवड करण्यात येणार आहे.
या बंपर मेगाभरतीमध्ये डॉक्टर्स, नर्सिंग स्टाफ, लॅब असिस्टंट, रेडिओग्राफर, हॉस्पिटल अटेंडेंट, हाउसकिपिंग असिस्टंट आदी जागा भरल्या जाणार आहेत. यात डॉक्टर्स 72 जागा, नर्सिंग स्टाफ 120 जागा, लॅब असिस्टंट 24, रेडिओग्राफर 24 पदे, हॉस्पिटल अटेंडेंट 120 जागा, हाऊस किपिंग असिस्टंट 240 जागा भरल्या जाणार आहेत. त्यामुळे उमेवारांना ही सुवर्णसंधी आहे. (हेही वाचा - कोणत्याही परिस्थितीत विद्यापीठांच्या परीक्षा घेतल्या जातील; उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांचे स्पष्टीकरण)
भारतीय रेल्वे या पदांसाठी थेट मुलाखत घेणार आहे. त्यामुळे उमेवारांची अगदी सहजासहजी निवड होणार आहे. यात डॉक्टर्स पदांसाठी 15 एप्रिल 2020 ला मुलाखत घेण्यात येणार आहे. तर नर्सिंग स्टाफसाठी 16 एप्रिल आणि लॅब असिस्टंट, रेडिओग्राफर, हॉस्पिटल अटेंडेंट, हाउसकिपिंग असिस्टंट आदी पदांसाठी 17 एप्रिल रोजी थेट मुलाखती घेण्यात येणार आहेत.
रेल्वेतील या पदांसाठी 18 ते 50 अशी वेगवेगळी वयोमर्यादा निश्चित करण्यात आली आहे. त्यामुळे उमेदावाराची वयोमर्यादा आणि इतर पात्रता लक्षात घेऊन निवड करण्यात येणार आहे. उमेदवाराने मुलाखतीच्या दिवशी आपली सर्व कागदपत्रे सोबत घेऊन यावीत, असे आवाहन भारतीय रेल्वेने केले आहे.