HRD Minister Ramesh Pokhriyal releases list India Rankings 2020 (Photo Credits: ANI)

मानव संसाधन विकास मंत्रालयाने (HRD Ministry) राष्ट्रीय संस्था रँकिंग फ्रेमवर्क (NIRF) जाहीर केले आहे. यात आयआयटी मद्रास (IIT Madras), आयआयएससी बेंगळुरू (IISc Bangalore) आणि आयआयटी दिल्ली (IIT-Delhi) यांची भारताच्या Top 3 शैक्षणिक संस्था म्हणून निवड झाली आहे. मनुष्यबळ विकास मंत्रालय दरवर्षी ही क्रमवारी जाहीर करते. ही क्रमवारीत दरवर्षी एप्रिलमध्ये प्रसिद्ध केली जाते, मात्र यावेळी कोविड-19 मुळे हे लांबणीवर पडले. क्रमवारीत आयआयएससी बंगळुरू, जवाहरलाल नेहरू विद्यापीठ आणि बनारस हिंदू विद्यापीठ हे भारतातील पहिले तीन विद्यापीठे ठरले आहेत. आयआयएम अहमदाबाद हे देशातील अव्वल बिजनेस स्कूल ठरले आहे, त्यानंतर आयआयएम बंगळूर आणि आयआयएम कलकत्ता आहे.

केंद्रीय मानव संसाधन विकास मंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी याबाबत माहिती दिली. दिल्ली येथील मिरांडा कॉलेज हे महाविद्यालयांमध्ये अव्वल ठरले आहे. त्यानंतर लेडी श्री राम कॉलेज फॉर वुमन आणि सेंट स्टीफन्स कॉलेज यांचा नंबर लागतो. देशातील अभियांत्रिकी महाविद्यालयांबद्दल बोलायचे झाले तर, आयआयटी मद्रास, आयआयटी दिल्ली आणि आयआयटी बॉम्बे पहिल्या 3 क्रमांकावर आहेत.

फार्मेसी कॅटेगरी मध्ये दिल्लीची जामिया हमदर्द ही टॉप इंस्टीट्यूट ठरली आहे.  त्यानंतर पंजाब विद्यापीठ, चंदीगड चा नंबर आहे. तिसर्‍या क्रमांकावर मोहाली येथील नॅशनल फार्मास्युटिकल रिसर्च इन्स्टिट्यूट आहे. मेडिकल कॉलेज प्रकारातील रँकिंगनुसार, एम्स दिल्ली हे देशात अव्वल स्थानावर आहे. त्यानंतर चंडीगडचे पीजीआय आणि वेल्लोरचे सीएमसी आहे. (हेही वाचा: Unlock 1: शाळा-महाविद्यालयासाठी सम-विषम फॉर्म्युला; विद्यार्थ्यांच्या सुरक्षतेसाठी NCRT कडून गाइडलाइन्स जारी)

दरम्यान, रँकिंगमध्ये समाविष्ट करण्यासाठी 3771 संस्थांनी 5805 अर्ज सादर केले होते. या संस्थांमध्ये 294 विद्यापीठे, 1071 अभियांत्रिकी संस्था, 630 व्यवस्थापन संस्था, 334 फार्मसी संस्था, 97 कायदे संस्था, 48 आर्किटेक्चर संस्था आणि 1659 जनरल पदवी महाविद्यालये आहेत.