लवकरच Banaras Hindu University मध्ये शिकवताना दिसू शकतात Neeta Ambani; विद्यापीठाने दिला Visiting Professor बनण्याचा प्रस्ताव
नीता अंबानी (Photo Credits: Instagram)

वाराणसीसह पूर्व उत्तर प्रदेशातील महिलांना सशक्त आणि समृद्ध करण्यासाठी बीएचयूने (Banaras Hindu University) एक विशेष योजना तयार केली आहे. देशातील सुप्रसिद्ध उद्योगपती आणि रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांची पत्नी नीता अंबानी (Neeta Ambani) यांना विद्यापीठाच्या व्हिजीटींग प्रोफेसर (Visiting Professor) बनण्यासाठी प्रस्ताव पाठविला आहे. सामाजिक विज्ञान संकाय मध्ये स्थापन केलेल्या महिला अभ्यास आणि विकास केंद्राने त्यांना ही ऑफर दिली आहे. रिलायन्स फाऊंडेशनच्या अध्यक्षा नीता अंबानी यांनी विद्यापीठाचा हा प्रस्ताव स्वीकारला तर, लवकरच त्या बीएचयूमध्ये महिलांना महिला अभ्यास शिकवताना दिसतील. 12 मार्च रोजी केंद्रात विद्याशाखा प्रमुखांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीनंतर हा प्रस्ताव देण्यात आला आहे.

मुकेश अंबानी यांच्या पत्नी नीता अंबानी यांनी मुंबई विद्यापीठातून बी.कॉम केले आहे आणि 2014 मध्ये त्या रिलायन्स इंडस्ट्रीजच्या कार्यकारी संचालक बनल्या. 2010 साली त्यांनी रिलायन्स फाऊंडेशनची स्थापना केली होती. त्या एक यशस्वी महिला उद्योजिका असल्यानेच त्यांना विद्यापीठाने हा प्रस्ताव पाठवला आहे. अशा परिस्थितीत अशी आशा व्यक्त केली जात आहे की, जर त्या बीएचयूमध्ये सामील झाल्या तर त्या पूर्व उत्तर प्रदेशातील महिला उद्यमांना चालना देण्यास मदत करतील.

सामाजिक विज्ञान विद्याशाखेचे डीन कौशल किशोर मिश्रा यांनी सांगितले की, बीएचयूमधील त्यांची व्याख्याने, कार्यशाळा व प्रशिक्षण कार्यक्रम महिलांना ऊर्जा देईल व महिला सशक्तीकरण मजबूत केले जाईल. प्राध्यापक कौशल किशोर मिश्रा म्हणाले की, नीता अंबानीशिवाय समाजातील इतर प्रबुद्ध आणि उद्योजक महिलांना केंद्राशी जोडण्याचा प्रयत्न केला जात आहे. (हेही वाचा: RSRS 2021: राज्य सभा सचिवालयात इंटर्नशिप आणि फेलोशिपसाठी संधी, येत्या 31 मार्च पर्यंत करता येणार अर्ज)

दरम्यान, नीता अंबानी यांनी महिला दिनादिवशी 'हर सर्कल' (Her Circle) सुरू करण्याची घोषणा केली. 'हर सर्कल' हा एक प्रेरणादायक आणि सर्वसमावेशक कंटेंट, सोशल मीडिया डिजिटल प्लॅटफॉर्म आहे. हा असा पहिला डिजिटल नेटवर्किंग प्लॅटफॉर्म आहे, ज्याचा उद्देश महिलांना अधिक सक्षम बनविणे आणि त्यांना सुसंवाद, गुंतवणूक, सहयोग आणि परस्पर मदतीसाठी एक सुरक्षित जागा उपलब्ध करुन देणे आहे.