खुशखबर! 1 डिसेंबरपासून सॅमसंगकडून भारतात मेगाभरती, इंजिनीअर विद्यार्थ्यांसाठी संधी; जाणून घ्या भरती प्रक्रिया आणि विभाग
Representational Image (Photo Credits: File Photo)

एकीकडे आयटी (IT) क्षेत्रातील नोकरदारांना नोकरी जाण्याची भीती असते, तर दुसरीकडे भारतात इंजिनिअर (Engineers) उमेदवारांसाठी मेगाभरती (Mega Recruitment) होणार आहे. मोबाईल हँड सेट आणि इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणांची निर्मिती करणारी, दक्षिण कोरियाची कंपनी सॅमसंग (Samsung) 1200 हून अधिक पदांसाठी भारतीय अभियंत्यांची भरती करणार आहे. कंपनीच्या एका निवेदनात म्हटले आहे की, सॅमसंग कंपनी आयआयटी आणि भारतातील अन्य अव्वल अभियांत्रिकी महाविद्यालयांमधून 1,200 हून अधिक अभियंत्यांना घेण्याचा विचार करीत आहे. या संस्थांकडून महाविद्यालयीन प्लेसमेंटद्वारे सॅमसंग स्वत: साठी अभियंते निवडेल. 2017 मध्ये सॅमसंगने या नोकर भरतीचे घोषणा केली होती.

नोकरी विभाग -

या संस्थांमधून निवडलेले अभियंते तंत्रज्ञान आणि डोमेनवर कार्य करतील. यात आर्ट‍िफिशियल इंटेलिजंस, मशीन लर्निंग, इमेज प्रोसेसिंग, मिडलवेअर डेव्हलपमेंट, क्लाऊड, नेटवर्क, व्हॉईस टेक्नॉलॉजी, व्हीएलएसआय आणि यूआय/यूएक्स इ. विभागांचा समावेश आहे. (हेही वाचा: खुशखबर! राज्यात डिसेंबरपासून तब्बल 72 हजार पदांची मेगाभरती; जाणून घ्या कोणत्या विभागात संधी)

प्रक्रिया - 

1 डिसेंबरपासून बेंगळुरू, नोएडा आणि दिल्ली येथील सॅमसंगचे तीन आर अँड डी (R And D) केंद्रे दिल्ली, कानपूर, मुंबई, मद्रास, गुवाहाटी, खडगपूर, बीएचयू, रुड़की, पलक्कड, तिरुपती, इंदूर, गांधीनगर, पाटणा, भुवनेश्वर, मंडी, भिलाई आणि जोधपूर येथील आयआयटी कॅम्पसमध्ये भेट द्तील. सॅमसंगने संगणक विज्ञान, इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन, इलेक्ट्रिकल अभियांत्रिकी, गणित व संगणन, इन्स्ट्रुमेंटेशन आणि माहिती तंत्रज्ञान या विषयांमधून विद्यार्थ्यांची नेमणूक करण्याची योजना आखली आहे, जेणेकरून अधिकाधिक नवीन कल्पनांवर कार्य करता येईल.

आयआयटीशिवाय, बीआयटीएस पिलानी, आयआयआयटी, एनआयटी, दिल्ली टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी, मनिपाल इंस्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी आणि आयआयएससी बेंगलोर यासारख्या इतर उच्च अभियांत्रिकी महाविद्यालयांतून सॅमसंग कंपनी विद्यार्थ्यांना निवडणार आहे.