खुशखबर! राज्यात डिसेंबरपासून तब्बल 72 हजार पदांची मेगाभरती; जाणून घ्या कोणत्या विभागात संधी
Representational Image (Photo Credits: File Photo)

काही महिन्यांपूर्वी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात विविध विभागांत तब्बल 72 हजार जागांची मेगाभरती (Mega Recruitment) करणार असल्याची घोषणा केली होती. त्यानंतर विद्यार्थी तसेच बेरोजगार या भरतीच्या प्रतीक्षेत होत. आता मात्र ही प्रतीक्षा संपली आहे. डिसेंबरपासून राज्यात या मेगाभरतीला सुरुवात होत आहे. शिक्षण, आरोग्य, पोलीस, पशुसंवर्धन, जिल्हा परिषद, नगरपालिका, महसूल अशा अनेक विभागांत मिळून तब्बल 72 हजार पदांची भरती होणार आहे. डिसेंबरपासून या भरतीला सुरुवात होत आहे, तर पुढील सहा महिन्यात ही भरती प्रक्रया पूर्ण केली जाणार आहे.

राज्यात या मेगभरातीची घोषणा झाल्यावर प्रशासनाकडून याबद्दल माहिती मागवण्यात आली होती. त्यानुसार डिसेंबरमध्ये या भरतीचे नियोजन केले जाणार आहे. त्यानुसार पशुसंवर्धन विभागासाठी पर्यवेक्षक, डॉक्टर, परीकॅरिका व अन्य रिक्त पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. डिसेंबर महिन्याच्या शेवटी पोलीस प्रशासन, जिल्हा परिषद व आरोग्य विभागातील पदांची भरती सुरु होईल. जवळजवळ सर्व पदांची भरती एकाचवेळी होणार आहे. यासाठी 15 डिसेंबर नंतर भरतीचे संपूर्ण वेळापत्रक जाहीर करण्यात येईल. (हेही वाचा: Sarkari Naukri: निरीक्षक, कॉन्स्टेबल व इतर जागांसाठी 1015 पदांची पोलिस भरती; 5 वी, 9 वी, 10 वी व 12 वी पास करू शकतात अर्ज)

या भरतीसाठी ज्या काही परीक्षा असतील त्याही पुढच्या महिन्यापासून सुरु होणार आहेत. महापरीक्षा सेलच्या या नियोजनानुसार साधारण 2020 पर्यंत राज्यात 72 हजार पदे भरली जातील. महापरीक्षा सेलचे कार्यकारी संचालक अजित पाटील यांनी हा भरतीचे नियोजन केले आहे. दरम्यान आज उद्धव ठाकरे मुख्यमंत्री पदाची शपथ घेत आहेत, व लवकरच नवे सरकार स्थापन केले जाईल. एकदा का नवे सरकार आले तर या भरतीच्या कामाला वेग येईल असे मत व्यक्त केले जात आहे.