Maharashtra SSC Result 2022: उद्या mahresult.nic.in वर जाहीर होणार 10 वी परीक्षेचा निकाल, उत्तीर्ण होण्यासाठी किमान गुणांची आवश्यकता; जाणून घ्या मागील पाच वर्षांतील उत्तीर्णांची सरासरी टक्केवारी
Result Representational Image (Photo Credits: File Photo)

राज्यात गेल्या अनेक दिवसांपासून दहावीच्या निकालाबाबत उत्सुकता होती. आता  महाराष्ट्र बोर्ड माध्यमिक शाळा प्रमाणपत्र (SSC) इयत्ता 10 वी परीक्षेचा निकाल शुक्रवार, 17 जून 2022 रोजी जाहीर केला जाणार आहे. शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी त्यांच्या सोशल मीडिया पोस्टमध्ये याबाबत माहिती दिली आहे. गायकवाड म्हणाल्या की, इयत्ता 10 वीचा निकाल उद्या दुपारी 1 वाजता जाहीर केला जाईल. हा निकाल जाहीर झाल्यानंतर तो अधिकृत वेबसाइट- mahresult.nic.in वर उपलब्ध होईल.

विद्यार्थ्यांना त्यांचा दहावीचा निकाल इतरही वेबसाईट्सवर मिळू शकतो. यामध्ये sscresult.mkcl.org, maharashtraeducation.com, result.mh-ssc.ac.in आणि mahahsscboard.in. यांचा समावेश आहे. या वेबसाइट्सद्वारे एसएससीचा निकाल मिळविण्यासाठी, उमेदवारांनी त्यांचा रोल नंबर, जन्मतारीख नमूद करणे आवश्यक आहे. त्यानंतर त्यांचा निकाल स्क्रीनवर दिसेल. हा निकाल डाउनलोड करून त्याची प्रिंट पुढील वापरासाठी घेऊ शकता. एप्रिलमध्ये संपलेल्या यंदाच्या 10 वीच्या परीक्षेला 16 लाखांहून अधिक विद्यार्थी बसले होते.

एसएससी, इयत्ता 10वी परीक्षा 2022 मध्ये उत्तीर्ण होण्यासाठी विद्यार्थ्यांना किमान 35 टक्के गुण प्राप्त करणे आवश्यक आहे. गेल्या वर्षी दहावीच्या परीक्षेत उत्तीर्ण होण्याचे प्रमाण 99.95 टक्के होते. 2020 मध्ये, एसएससी परीक्षेतील उत्तीर्णतेची टक्केवारी 93.32 टक्के, 2019 मध्ये 77.10 टक्के, 2018 मध्ये 88.41 टक्के, 2017 मध्ये 88.7 टक्के आणि 2016 मध्ये 89.56 टक्के होती. (हेही वाचा: ITI Admission 2022: राज्य सरकारचा मोठा निर्णय; गुणांकनाच्या कोणत्याही अटीशिवाय नक्षलवादी युवक-युवतींना 'आयटीआय'ला प्रवेश)

दरम्यान, 8 जून रोजी 12 विचा निकाल जाहीर झाला. यामध्ये एकूण 94.22 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले. बारावीच्या कला शाखेची उत्तीर्णतेची टक्केवारी 90.51 टक्के, विज्ञान- 98.3 टक्के आणि वाणिज्य- 91.71 टक्के इतकी आहे.