Representational Image (Photo Credits: Wikimedia Commons)

गेल्या काही आठवड्यांपासून महाराष्ट्रामध्ये कोरोना विषाणू (Coronavirus) प्रकरणांमध्ये घट होत असलेली दिसत आहे. यामुळे राज्य सरकारने अनेक निर्बंध शिथिल केले आहेत. याच पार्श्वभूमीवर शिक्षण विभागाने मोठा निर्णय घेत राज्यातील शाळा (Maharashtra Schools) 17 ऑगस्टपासून सुरु करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र कोविड टास्क फोर्स महाराष्ट्र सरकारच्या या निर्णयाशी सहमत नाही. अशा स्थितीत आता राज्य सरकार शाळा उघडण्याच्या निर्णयावर पुनर्विचार करत आहे. राज्य मंत्रिमंडळात बुधवारी या विषयावर चर्चा झाली. त्यामुळे आता राज्य सरकारने या निर्णयाला स्थगिती देण्याचा निर्णय घेतला आहे.

याबाबत राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे म्हणाले, ‘टास्क फोर्सच्या सदस्यांनी शाळा उघडण्याच्या निर्णयाला विरोध केला आहे. त्यांना भीती वाटत आहे की 18 वर्षांखालील मुलांचे अद्याप लसीकरण केले गेले नाही, त्यामुळे त्यांना विषाणूचा धोका असू शकतो.’ म्हणूनच राज्य सरकारने आपला शाळा उघडण्याचा निर्णय मागे घेतला आहे. मंत्री टोपे पुढे म्हणाले की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या प्रकरणी राज्य टास्क फोर्स आणि शालेय शिक्षण विभागासोबत बैठक घेतील. शाळांबाबत अंतिम निर्णय या बैठकीतच घेतला जाईल. (हेही वाचा: UGC-NET 2021: यूजीसी-नेट जून 2021परिक्षेच्या नोंदणी प्रक्रियेला सुरूवात, 'असा' कराल अर्ज)

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अशीच एक बैठक बुधवारी आयोजित करण्यात आली होती, परंतु त्यामध्ये कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. गेल्या आठवड्यात राज्याच्या शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितले होते की, कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झालेल्या शहरी भागातील इयत्ता 8 ते 12 वी चे वर्ग व ग्रामीण भागातील इयत्ता 5 वी ते 7 वी चे वर्ग सुरू करण्याबाबत सरकार विचाराधीन आहे. त्यानुसार 17 ऑगस्ट, 2021 पासून राज्यातील ग्रामीण भागातील इयत्ता 5 वी ते 7 चे वर्ग व शहरी भागातील इयत्ता 8 वी ते 12 वी चे वर्ग सुरु करण्यास परवानगी देण्यात आली होती.

याबाबत मंगळवारी, एसओपी जारी करताना राज्य सरकारने म्हटले होते की, फक्त अशा गावांमध्ये आणि शहरांमध्ये शाळा उघडता येतील, जिथे गेल्या महिन्यात कोरोना विषाणूच्या संसर्गाची प्रकरणे सतत कमी झाली आहेत. आता फोर्सच्या बैठकीनंतर 17 ऑगस्टपासून शाळा उघडणार नसल्याचे सांगण्यात आले आहे.