Maharashtra Board SSC Exam 2021: महाराष्ट्र बोर्डाची दहावीची परीक्षा रद्द, बारावीची परीक्षा होणार; राज्य सरकारचा मोठा निर्णय 
Exams | (Image Used For Representational Purpose | Photo Credits: Pixabay.com )

महाराष्ट्रात कोरोना विषाणूचा (Coronavirus) धोका लक्षात घेता राज्य सरकारने, दहावी बोर्ड परीक्षा (Maharashtra Board SSC Exam 2021) रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्राच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्या म्हणण्यानुसार, राज्यातील कोरोनाची अवस्था दिवसेंदिवस धोकादायक बनत चालली आहे, त्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, बारावीच्या परीक्षा होणार आहेत व परीक्षांच्या नव्या तारखांची घोषणा राज्यातील कोरोनाची स्थिती पाहून केली जाणार आहे. याआधी इयत्ता दहावीची परीक्षा जून महिन्यात तर बारावीची परीक्षा मे महिन्यात घेतली जाणार असल्याची माहिती मिळाली होती.

या महिन्याच्या सुरुवातीस, राज्यातील शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी राज्यात कोरोना व्हायरसच्या संसर्गाच्या वाढत्या घटनांमुळे, दहावी आणि बारावी बोर्ड परीक्षा 2021 पुढे ढकलण्याची घोषणा केली. मंत्री मंडळाने असे म्हटले होते की, राज्यात मंडळाच्या परीक्षा घेण्यासाठी सध्याची परिस्थिती अनुकूल नाही. सीबीएसई आणि सीआयएससीईनेही दहावीच्या बोर्ड परीक्षा आणि 12 वीच्या परीक्षा पुढे ढकलल्या आहेत. आता महाराष्ट्र बोर्ड 10 वी च्या सर्व विद्यार्थ्यांना 11 वीच्या वर्गात ढकलणार आहे. यासाठी विद्यार्थ्यांचे अंतर्गत मूल्यांकनही केले जाणार आहे.

यावेळी वर्षा गायकवाड म्हणाल्या, ‘आता शालेय शिक्षणाच्या माध्यमातून आम्ही निर्णय घेतोय की, दहावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा रद्द करून, अंतर्गत मूल्यांकन करून ते पुढे कसे गेले पाहिजे, याबाबत आम्ही चर्चा करू. ज्या विद्यार्थ्यांना जास्त गुणांची अपेक्षा असेल, त्यांच्याबाबतही परीक्षा घ्यायची किंवा कसे पुढे जायचे त्याबाबत भविष्यात निर्णय घेऊ. सर्व बोर्डात समानता असावी, म्हणून शालेय शिक्षणाच्या माध्यमातूनही आम्ही हा निर्णय घेत आहोत.’ (हेही वाचा: ICSE Board Exams 2021Update: CISCE कडून 10 वीची परीक्षा वाढत्या कोविड 19 संकटच्या पार्श्वभूमीवर रद्द)

दरम्यान, महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी राज्यातील ऑक्सिजनच्या स्थितीचा उल्लेख करून, राज्यातील लॉकडाऊनकडे लक्ष वेधले आहे. टोपे यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना उद्या रात्री 8 वाजेपासून संपूर्ण लॉकडाउन लागू करण्याची विनंती केली आहे.