महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या 12वी बोर्ड परीक्षेचा निकाल आज (21 मे) जाहीर करण्यात आला आहे. यंदाच्या निकालामध्ये कोकण विभाग अव्वल ठरले आहे तर यंदा पुन्हा मुंबई विभागातील बारावीचा निकाल घसरला आहे. सर्वात कमी निकाल हा मुंबई विभागाचा लागला आहे. बोर्डाने दिलेल्या माहितीनुसार यंदा राज्यात बारावीची परीक्षा 14,23,970 विद्यार्थ्यांनी दिली होती त्यापैकी 13,29,684 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. त्यामुळे ज्यांना या परीक्षेमध्ये अपेक्षित यश मिळालेले नाही त्यांच्यासाठी Revaluation, Photocopy मागवून घेऊन निकालाची फेरपडताळणी करण्याचा पर्याय आहे. verification.mh-hsc.ac.in वर हा पर्याय दिला जातो.
बोर्डाने दिलेल्या माहितीनुसार verification.mh-hsc.ac.in वर अर्ज करण्यासाठी विद्यार्थ्यांना 22 मे ते 5 जून पर्यंतचा अवधी देण्यात आला आहे. ऑनलाईन माध्यामातून विद्यार्थ्यांना गुणपडताळणी, पुर्नमुल्यांकन, उत्तरपत्रिकांची फोटोकॉपी देण्यासाठी अर्ज स्वीकरले जाणार आहेत. विद्यार्थी स्वतः किंवा कॉलेजच्या माध्यमातूनही यासाठी अर्ज सादर करू शकतात. Maharashtra Board HSC Result 2024 Declared: महाराष्ट्र बोर्डाचा बारावीचा निकाल यंदा 93.37 %.
गुणपडताळणीसाठी प्रती विषय 50 रुपये इतकं शुल्क ऑनलाईन पद्धतीनं आकारले जाणार आहे. उत्तरपत्रिकांच्या छायाप्रती मागणीसाठी इमेल, रजिस्टर पोस्ट किंवा हाती अर्ज केला जाऊ शकतो. मागणी केलेल्या पध्दतीने छायाप्रती उपलब्ध करुन दिल्या जातील. उत्तरपत्रिकेच्या छायाप्रती मिळवण्यासाठी प्रति विषय 400 रुपये शुल्क आकारलं जाणार आहे.
उत्तरपत्रिकांचं पुनर्मूल्यांकन करण्यासाठी विद्यार्थ्यांना आधी उत्तरपत्रिकेची छायाप्रत घेणं बंधनकारक आहे. उत्तर पत्रिकेची छायाप्रत मिळाल्याच्या दिवसापासून पुढील कार्यालयीन कामाच्या पाच दिवसांत पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज केला जाऊ शकतो. विहित नमुन्यात प्रति विषय 300 रुपयांप्रमाणे शुल्क ऑनलाईन पद्धतीनं भरून तो विभागीय मंडळाकडे विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज करणं आवश्यक असणार आहे. तर श्रेणी सुधार परीक्षा बोर्डाकडून जुलै महिन्यात आयोजित केली जाणार आहे. त्याच्या माध्यमातूनही तुम्हांला पुन्हा परीक्षा देऊन गुण सुधारण्याची संधी मिळणार आहे.