
मार्च 2025 मध्ये महाराष्ट्र एसएससी बोर्ड परीक्षेसाठी (Maharashtra SSC Board 2025 Exam) जवळपास 16 लाख विद्यार्थी बसले होते. आता हे विद्यार्थी व त्यांच्या पालकांना एकाच गोष्टीची काळजी आणि उत्सुकता आहे ती म्हणजे यंदा दहावीचा निकाल कधी लागणार? सध्या तरी याबाबत काही ठोस माहिती अथवा तारीख समोर आलेली नसली तरी, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ या वर्षी 15 मे 2025 पर्यंत दहावीचा निकाल जाहीर करू शकते अशी शक्यता आहे. यंदा 2025 मध्ये 10 वी परीक्षा 21 फेब्रुवारी ते 17 मार्च 2025 दरम्यान पार पडली.
10 वीची परीक्षा व निकाल हा विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील एक टर्निंग पॉईंट असल्याचे मानले जाते. कारण या नंतरच विद्यार्थ्यांना विज्ञान, कला किंवा वाणिज्य शाखेत शिक्षण घ्यायचे हे ठरवता येते. या वर्षीचा निकाल हा गेल्या वर्षीपेक्षा लवकर लागू शकतो, कारण या वर्षी 10 वीची 10 दिवस अगोदर सुरु झाली होती. त्यामुळेच एसएससी बोर्ड या वर्षी चा निकाल हा 15 मेच्या अगोदर लावणार असल्याचा मानस बोर्डाने जाहीर केला आहे. मात्र त्यामध्ये उशीर होण्याचीही शक्यता नाकारली जाऊ शकत नाही.
याआधीच्या दोन वर्षांमध्ये दहावी आणि बारावीचा निकाल हा मे महिन्याच्या अखेरीस जाहीर करण्यात आला आहे. यंदा दहावी आणि बारावीचा निकाल मे महिन्यातच जाहीर करता यावा, या दृष्टीकोनातून उत्तरपत्रिका तपासण्याचे काम सुरु आहे. राज्यातील विद्यार्थ्यांच्या उच्च शिक्षणाच्या वाढत्या संधी लक्षात घेता, राज्य मंडळाने दहावी आणि बारावी दोन्ही परीक्षा लवकर घेण्यासोबतच त्यांचे निकाल जलद जाहीर करण्याची भूमिका स्वीकारली आहे. बोर्डाचे अधिकारी त्यांची अधिकृत वेबसाइट- mahresult.nic.in वर वार्षिक बोर्ड परीक्षांचे निकाल जाहीर करतील. निकाल जाहीर झाल्यानंतर, विद्यार्थी लॉगिन विंडोमध्ये त्यांचे लॉगिन क्रेडेन्शियल्स रोल नंबर आणि आईचे पहिले नाव भरून त्यांचे गुण तपासू शकतात. (हेही वाचा: महाराष्ट्रात 2025-26 पासून सुरू होणारा सरकारी शाळांमधील CBSE पॅटर्न कसा असणार? जाणून घ्या बोर्ड निवडता येणार का? ते SSC Board बंद होणार का?)
दरम्यान, शिक्षणमंत्री दादाजी भुसे यांनी बारावी आणि दहावीच्या परीक्षा कॉपीमुक्त, भयमुक्त आणि निकोप वातावरणामध्ये सुरळीत पार पडाव्यात यासाठी शालेय शिक्षण विभाग आणि महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाने प्रयत्न करण्याचे निर्देश दिले होते. परीक्षा केंद्रापासून 500 मीटर परिसरात झेरॉक्स सेंटर परीक्षा कालावधीत बंद ठेवण्यात, तर संबंधित परीक्षा केंद्राच्या परिसरात 144 कलम लागू करण्यात आले. फेब्रुवारी-मार्च 2025 च्या परीक्षांमध्ये ज्या परीक्षा केंद्रावर गैरमार्गाची प्रकरणे आढळून येतील त्या केंद्रांची परीक्षा केंद्र मान्यता पुढील वर्षीपासून कायमची रद्द करण्याबाबतची कार्यवाही करण्यात येणार असल्याचेही सांगण्यात आले होते.