Students | File Image

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ (MSBSHSE) दरवर्षी दहावीच्या (SSC) परीक्षा आयोजित करते, आणि 2025 मधील या परीक्षांचे निकाल मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात, म्हणजेच 15 मे 2025 पर्यंत जाहीर होण्याची शक्यता आहे. ही परीक्षा 21 फेब्रुवारी ते 17 मार्च 2025 दरम्यान ऑफलाइन पद्धतीने घेण्यात आली होती. निकाल जाहीर झाल्यानंतर, विद्यार्थ्यांना 11वीच्या प्रवेश प्रक्रियेला सामोरे जावे लागते, जी महाराष्ट्रातील कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये प्रवेशासाठी पूर्णपणे ऑनलाइन आहे. ही प्रक्रिया पारदर्शक आणि गुणवत्तेवर आधारित आहे, आणि यामुळे विद्यार्थ्यांना विज्ञान, वाणिज्य, कला किंवा व्यावसायिक अभ्यासक्रम निवडण्याची संधी मिळते.

शैक्षणिक वर्ष 2025-26 पासून महाराष्ट्र राज्य मंडळाच्या मान्यताप्राप्त उच्च माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये, इयत्ता 11 वीचे प्रवेश केंद्रीय ऑनलाईन पद्धतीने करण्याचे निश्चित करण्यात आलेले आहेत. यानुसार मुंबई विभागातील मार्च 2025 मध्ये इयत्ता 10 वीच्या परीक्षेस प्रविष्ट झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे इयत्ता 11 वीचे प्रवेश ऑनलाईन पद्धतीनेच होणार असल्याचे मुंबई विभागीय शिक्षण उपसंचालक संदीप संगवे यांनी कळविले आहे.

दहावीच्या निकालापूर्वी अकरावी प्रवेशाचा भाग एक आणि दहावीच्या निकालानंतर अकरावी प्रवेशाचा भाग दोन भरण्यात येत असतो. मिळालेल्या माहितीनुसार येत्या काही दिवसांनी इयत्ता अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया सुरू होणार आहे.

अकरावीच्या वर्गात प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांना पुढील कागदपत्रांची आवश्यकता असेल-

आधार कार्ड, रेशन कार्ड, दहावीचे स्कूल लिविंग सर्टिफिकेट, दहावीचे गुणपत्रक, कास्ट सर्टिफिकेट, इनकम सर्टिफिकेट, नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र, ईडब्ल्यूएस पात्रता प्रमाणपत्र, दिव्यांग प्रमाणपत्र.

ऑप्शनल कागदपत्रे- शासनाच्या एखाद्या प्रकल्पाने बाधित झालेले प्रकल्पग्रस्त आणि भूकंपात बाधित झालेल्यांना भूकंपग्रस्त असल्याचे प्रमाणपत्र द्यावे लागेल. आजी- माजी सैनिकांच्या मुलांना सुद्धा प्रमाणपत्र द्यावे लागणार आहे. आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय खेळाडू असणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र, अनाथ विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र, परदेशातून येणार्‍या विद्यार्थ्यांनी संबंधित देशातील भारतीय दूतावासाची सही व शिक्का असलेले दाखला व गुणपत्रक आणि राज्य शासन किंवा केंद्र शासन किंवा खाजगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांची बदली झालेल्या पालकांच्या पाल्यांसाठी हस्तांतरण आदेश आणि सामीलीकरण पत्र सुद्धा सादर करावे लागणार आहे. (हेही वाचा: Eligible for Re Exam: बारावीच्या निकालामध्ये 'Eligible for Re Exam' अशा दिल्या जाणार्‍या शेर्‍याचा अर्थ काय?)

इयत्ता 11 वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेबाबत सविस्तर सूचना व मार्गदर्शन इयत्ता 11 वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेचे संकेतस्थळ सुरू झाल्यानंतर विद्यार्थी व पालकांना उपलब्ध करून दिले जाईल. इयत्ता 11 वी ऑनलाईन प्रवेशाचा अर्ज ऑनलाईन सादर करण्यापूर्वी विद्यार्थी व पालकांनी सदर सूचनांचे बारकाईने वाचन करूनच आपला प्रवेश अर्ज सादर करावा, असे आवाहन मुंबई विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयामार्फत करण्यात आले आहे.