Exam | Image used for representational purpose | (Photo Credits: Unsplash.com)

एप्रिल महिन्यात होणारी जेईई मुख्य परीक्षा (JEE Main Exam) पुढे ढकलण्याचा निर्णय नॅशनल टेस्टिंग एजन्सी (National Testing Agency) ने घेतला आहे. देशातील कोविड-19 (Covid-19) च्या परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर या परीक्षेचे बदलले वेळापत्रक जाहीर करण्यात येईल. परीक्षेच्या 15 दिवस आधी विद्यार्थ्यांसाठी वेळापत्रक जारी करण्यात येईल, अशी माहिती एनटीए (NTA) ने दिली आहे. ही परीक्षा 27, 28 आणि 30 एप्रिल रोजी होणार होती.

"सध्याची कोरोना व्हायरसची परिस्थिती पाहता मी जेईई परीक्षा पुढे ढकलण्यासंदर्भात एनटीएला सूचित केले आहे. विद्यार्थ्यांची सुरक्षितता आणि त्यांचे भवितव्य जपणे," हे माझे प्राधान्य असल्याचे केंद्रीय शिक्षण कॅबिनेट मंत्री रमेश पोखरियाल यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

ANI Tweet:

(हे ही वाचा: वाढत्या कोरोना संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर सीबीएसई बोर्डाची 10 वीची परीक्षा रद्द; 12 वी ची परीक्षा लांबणीवर)

सध्या देशात कोरोनाची दुसरी लाट वेगाने पसरत आहे. कोरोना संसर्गाच्या भीतीपोटी परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांनी परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी सोशल मीडियाद्वारे केली होती. एनटीएचे अधिकारी आणि शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल यांना टॅग करुन परीक्षा पुढे ढकलण्याबाबत विद्यार्थ्यांनी ट्विटरवर तगादा लावला होता. त्यानंतर एनटीएकडून परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

जेईई मुख्य परीक्षेचे एकूण चार सेशन्स असतात. फेब्रुवारी, मार्च, एप्रिल आणि मे या दरम्यान या चारही सत्रांच्या परीक्षा होतात. यापैकी पहिले दोन सेशन्स फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात घेण्यात आले आहेत. फेब्रुवारी मध्ये 6 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली असून मार्चमध्ये 5.5 लाख विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली आहे. फेब्रुवारी सत्राचा निकाल हा गेल्या महिन्यात जाहीर करण्यात आला होता.