Class 10 and 12 Board Exams 2022: 10 वी-12 वी बोर्डासाठी CBSE कडून नव्या मुल्यांकन पद्धतीची घोषणा; दोन सत्रात होणार परीक्षा
Representational Image (Photo credits: PTI)

कोविड-19 संकटाच्या (Covid-19 Pandemic) पार्श्वभूमीवर केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने 10 वी आणि 12 वी च्या पुढील वर्षांच्या बोर्ड परीक्षेसाठी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. पुढील शैक्षणिक वर्षात नवी मुल्यांकन पद्धत लागू होणार असून शैक्षणिक वर्ष दोन सत्रात विभागले जाणार आहे. त्यामुळे दोन सत्रात परीक्षा होणार आहेत. अंतर्गत मुल्यांकन, प्रॅक्टिकल आणि प्रोजेक्ट वर्क या आधारे विद्यार्थ्यांचे मुल्यमापन करण्यात येईल. (CBSE ‘DADS’ Portal: आता सीबीएसई च्या विद्यार्थ्यांना डुप्लीकेट मार्कशीट, माइग्रेशन सर्टिफिकेट मिळवण्यासाठी खास ऑनलाईन सुविधा; इथे पहा त्याचे दर!)

सीबीएसई चे निर्देशक जोसेफ इमॅनुएल यांनी जारी केलेल्या  आदेशानुसार, पहिल्या सत्रातील परीक्षा नोव्हेंबर-डिसेंबर 2021 मध्ये होईल तर दुसऱ्या सत्रातील परीक्षा मार्च-एप्रिल 2022 मध्ये होतील. शैक्षणिक सत्र 2021-22 साठी अभ्यासक्रम तर्कसंगत पद्धतीने दोन भागात विभागला जाईल. त्यासाठी विषय तज्ञांची मदत घेतली जाईल, असेही त्यांनी सांगितले.

विभाजित केलेल्या अभ्यासाक्रमाच्या आधारे बोर्ड प्रत्येक सत्राच्या शेवटी परीक्षा घेईल. दहावी, बारावीच्या शैक्षणिक वर्षाअखेर सुद्धा परीक्षा घेतल्या जाव्यात, हा देखील या निर्णयामागील हेतू आहे, असे जोसेफ यांनी सांगितले.

बोर्ड परीक्षा 2021-22 चा अभ्यासक्रमाची माहिती जुलै 2021 मध्ये देण्यात येईल. शाळांकडून देखील वेगळ्या शैक्षणिक वेळापत्रकाचा वापर केला जाईल आणि एनसीईआरटी कडून सुद्धा मदत घेतली जाईल. अंतर्गत मुल्यांकन, प्रॅक्टिकल आणि प्रोजेक्ट वर्क यावर अधिक भर दिला जावून बोर्डाने दिलेल्या गाईडलाईन्सनुसार विद्यार्थ्यांचे योग्य मुल्यमापन केले जाईल, असेही ते म्हणाले.

कोविड-19 संकटामुळे ही नवी योजना मंडळामार्फत आणली गेली आहे. दरम्यान, या संकटामुळे मागील वर्षी काही विषयांची बोर्ड परीक्षा व यंदाची संपूर्ण बोर्डाची परीक्षा रद्द करावी लागली होती.